नागपूरच्या कुलगुरूंना मुदतवाढ मिळण्याची शक्यता : सोमवारी निर्णयाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 12:25 AM2020-04-05T00:25:16+5:302020-04-05T00:26:22+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांचा कार्यकाळ वाढण्याची शक्यता आहे. या संदर्भात राजभवनात नियम व कायद्यातील तरतुदींसंदर्भात पडताळणी केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांचा कार्यकाळ वाढण्याची शक्यता आहे. या संदर्भात राजभवनात नियम व कायद्यातील तरतुदींसंदर्भात पडताळणी केली जात आहे. सोमवारी यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. काणे यांचा कार्यकाळ ७ एप्रिलला संपणार आहे.
महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी अॅक्ट २०१६ नुसार, विद्यापीठांच्या कुलगुरूंचा कार्यकाळ साधारण: पाच वर्षांचा ठरला आहे. मात्र या कायद्यातील तरतुदीमध्ये कार्यकाळ संपल्यावर त्यात वाढ करण्यासंदर्भात कसलाही उल्लेख नाही. कुलगुरूंचा कार्यकाळ संपल्यावर नव्या कुलगुरूंची नियुक्ती होईपर्यंत जवळच्या कुलगुरूंकडे विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार दिला जात असतो. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांना हा प्रभार देण्यासंदर्भात विचार सुरू होता. मात्र सध्या कोरोनामुळे सर्वच विद्यापीठांमध्ये सारखी परिस्थिती आहे. परीक्षा स्थगित झाल्या असून शैक्षणिक सत्रही डळमळीत होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्या कुलगुरूंकडे पदभार सोपविल्यास एका वेळी दोन विद्यापीठांचा कारभार सांभाळताना कामकाज प्रभावित होण्याची शक्यता असल्याचे मत पुढे आल्याची सूत्रांची माहिती आहे. हे टाळण्यासाठी डॉ. काणे यांचा कार्यकाळ किमान तीन महिन्यांसाठी वाढविण्यासंदर्भात विचार सुरू आहे. पुढील तीन महिन्यात परिस्थिती सामान्य होण्याची शक्यता आहे. हा अवधी संपल्यावर कुण्या अन्य विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे पदभार सोपविला जाऊ शकतो. या संदर्भात डॉ. काणे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ही बाब फेटाळून लावली. असे असले तरी सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांचा कार्यकाळ वाढविण्यावर विचार सुरू आहे.
देशपांडे यांना प्रभार सोपविण्यावर प्रश्नचिन्ह
यापूर्वी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी राजीनामा दिल्यानंतर तत्कालीन विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्याकडे विद्यापीठाचे कुलगुरुपद सोपविण्यात आले होते. यानंतर त्यांच्याकडून पदभार काढून डॉ. विनायक देशपांडे यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला होता. मात्र मागील वर्षी डॉ. काणे यांच्या एक महिन्याच्या रजेदरम्यान डॉ. चांदेकर यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला होता. हे पाहू जाता, डॉ. देशपांडे प्र-कुलगुरू असले तरी, त्यांच्याकडे कुलगुरुपदाचा प्रभार सोपविला जाण्याची शक्यता कमीच आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. देशपांडे यांच्याकडून नियुक्तीसंदर्भात प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे.