नागपुरात त्या कोरोनाग्रस्तांनी केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 09:04 PM2021-03-30T21:04:36+5:302021-03-30T21:09:20+5:30
Corona victim suicide दोन कोरोनाग्रस्तांनी गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली. दोन्ही रुग्ण वृद्ध असून एकाने ऑक्सिजनच्या नळीने रुग्णालयात तर दुसऱ्याने राहत्या घरी गळफास घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन कोरोनाग्रस्तांनी गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली. दोन्ही रुग्ण वृद्ध असून एकाने ऑक्सिजनच्या नळीने रुग्णालयात तर दुसऱ्याने राहत्या घरी गळफास घेतला. आजाराला कंटाळून रुग्णांनी टोकाचे पाऊल उचलले असावे, असे बोलले जात आहे.
रामबाग-इमामवाडा येथील मृत ८१ वर्षीय रुग्ण २५ मार्च रोजी मेडिकलच्या मेडिसीन कॅज्युल्टीमध्ये आला. रुग्णाला लक्षणे असल्याने तातडीने रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात आली. पॉझिटिव्ह अहवाल येताच मेडिकलच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलच्या तळमजल्यावरील वॉर्डात भरती करण्यात आले. धुळवडच्या सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान शौचालयाची स्वच्छता करण्यासाठी आलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्याला खिडकीला ऑक्सिजनची नळी बांधून गळफास लावलेला हा रुग्ण आढळून आला. त्याने तातडीने याची माहिती उपस्थित डॉक्टरांना दिली. रुग्णाला खाली उतरवून डॉक्टरांनी तपासले, परंतु त्याचा मृत्यू झाला होता. याची माहिती अजनी पोलीस ठाण्यात देण्यात आली. या रुग्णाला रोज २ ते ४ लिटर ऑक्सिजन लागत होते. याच ऑक्सिजन नळीचा वापर त्याने गळफास लावण्यासाठी केला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
तर दुसरी घटना अजनी पोलीस स्टेशनच्या परिसरात घडली आहे. या वृद्धाचे वय ६८ वर्षे होते. या रुग्णाची कोरोना चाचणी २६ मार्चला पाॅझिटिव्ह आली. या रुग्णाच्या कुटुंबातील इतर सदस्यही कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे समजते.