नागपूरचे विधानभवन विधिमंडळ सुरक्षा व्यवस्थेच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 10:10 PM2017-12-01T22:10:20+5:302017-12-01T22:11:50+5:30
येत्या ११ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू आहे. विधिमंडळातील सुरक्षा व्यवस्थेने शुक्रवारपासून विधान भवन व परिसर आपल्या ताब्यात घेतला असून येथील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक झाली आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : येत्या ११ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू आहे. विधिमंडळातील सुरक्षा व्यवस्थेने शुक्रवारपासून विधान भवन व परिसर आपल्या ताब्यात घेतला असून येथील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक झाली आहे. यासोबतच मुंबईवरून विधिमंडळातील शंभरावर अधिकारी-कर्मचारीसुद्धा दाखल झाले आहेत.
हिवाळी अधिवेशनाला आता काही दिवस उरले आहेत. विधान भवनात कामे जोरात सुरू आहेत. विविध मंत्री, अधिकारी यांचे दालन व कार्यालयात नावांचे फलक लावण्याचे काम जोरात सुरूआहे. विधान भवनातील कामे शेवटच्या टप्प्यात आहेत. दहा दिवसांपूर्वीच विधिमंडळातील सुरक्षा व्यवस्थेने विधान भवन व परिसर आपल्या ताब्यात घेतले आहे. विधिमंडळातील सुरक्षा रक्षक हे गुरुवारीच नागपुरात दाखल झाले. गुरुवारी त्यांनी विधान भवन परिसरातील पाहणीही केली. शुक्रवारी त्यांनी रीतसर येथील सुरक्षा व्यवस्था आपल्या ताब्यात घेतली आहे. शुक्रवारपासून विधान भवनात प्रत्येक वाहनाची कसूच तपासणी केली जात आहे. प्रत्येक व्यक्तीलासुद्धा चौकशी करूनच आत सोडले जात आहे. ज्यांना कार्यालयीन काम आहे, अशांनाच आत सोडले जात आहे. मुंबईवरून शंभरावर अधिकारी-कर्मचारीसुद्धा शुक्रवारी सकाळीच नागपुरात दाखल झाले आहेत. सोमवारपासून ते आपापल्या कार्यालयातील कामकाजाला सुरुवात करण्याची शक्यता आहे.
विविध साहित्य घेऊन पाच ट्रक दाखल
मुंबई मंत्रालयातील विविध दस्ताऐवज व साहित्य घेऊन पाच ट्रकसुद्धा दुपारी विधान भवनात दाखल झाले. या ट्रकमध्ये विविध विभागातील महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांसह साहित्य आहे. अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन कामकाजाचे साहित्य आहे. हे सर्व साहित्य ट्रकमधून उतरविण्याचे काम शुक्रवारी पार पडले. शनिवारपासून हे साहित्य विविध कार्यालयात लावण्याचे काम केले जाईल. यासाठी अधिकारी-कर्मचारी शुक्रवारीच दाखल झाले आहेत.