नागपूर-विदर्भ ही प्रतिभावंतांची भूमी
By admin | Published: May 20, 2017 02:51 AM2017-05-20T02:51:55+5:302017-05-20T02:51:55+5:30
नागपूरच नव्हे तर अवघा विदर्भ प्रदेश हा प्रतिभावंतांची भूमी आहे. येथे प्रतिभांचा अभाव नाही.
नंदा जिचकार : युवा भीम मैत्रेय संघातर्फे विजेत्यांना बक्षीस वितरण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरच नव्हे तर अवघा विदर्भ प्रदेश हा प्रतिभावंतांची भूमी आहे. येथे प्रतिभांचा अभाव नाही. फक्त त्यांना योग्य व्यासपीठाची गरज आहे. त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी युवा भीम मैत्रेय संघासारख्या इतर संस्थांनीही पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त बेझनबाग युवा भीम मैत्रेय संघ व युवा भीम महिला मैत्रेय संघातर्फे जयंती व वर्धापन सोहळा नुकताच पार पडला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. याप्रसंगी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकही प्रदान करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव, बसपा पक्ष नेते मोहम्मद जमाल, नगरसेवक नरेंद्र वालदे, नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार, माजी नगरसेवक संजय बोंडे, सुमेधा राऊत, सूरमणी पं. प्रभाकर धाकडे, ग्रीन व्हिजीलचे संचालक कौस्तुभ चॅटर्जी, सहायक पोलीस आयुक्त राजदत्त बनसोड, नगरसेविका वंदना चांदेकर, विरंका भिवगडे, रेमंड समूहाचे निशिकांत शेंडे उपस्थित होते.
संगीताचे परीक्षक म्हणून सुप्रसिद्ध गझल गायिका बीना चॅटर्जी, अमर कुलकर्णी यांनी परीक्षण केले. नृत्य स्पर्धेचे परीक्षण दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री श्रेया व्यास, टॉलिवूडचे कोरिओग्राफर सचिन यांनी केले. ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तुभ चॅटर्जी यांनी पर्यावरणसंबधी मार्गदर्शन केले. नृत्य व गायन स्पर्धेचे सूत्रसंचालन आरजे मिलिंद यांनी केले.
संकेत, प्राचीला पुरस्कार
सोलो संगीतात संकेत वाखरकर, देविका नायर व सखी हामिद हुसैन यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार पटकाविले. सोलो नृत्यात प्राची प्रजापती, मैत्रेया इंगळे व मेहेर करांडे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार प्राप्त केले. समूह नृत्यात एल्केमी डांस क्रू यांनी प्रथम, डी-१ डांस क्रू यांनी द्वितीय तर जस्ट रियल डांस क्रू यांनी तृतीय पुरस्कार पटकाविले. आशिष व ऋषी यांना युगल नृत्यात विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.