नागपूर विधानभवन वर्षभर गजबजणार; कायमस्वरूपी कक्ष कार्यान्वित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2021 05:54 AM2021-01-04T05:54:17+5:302021-01-04T05:54:45+5:30
मान्यवरांच्या उपस्थितीत आज होणार लोकार्पण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपूरमध्ये घेण्याची नागपूर करारानुसार सुरू झालेली परंपरा, संसदीय लोकशाहीत वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. विधानमंडळ सचिवालयाचा कायमस्वरूपी कक्ष उद्या सोमवारपासून नागपूरच्या विधानभवनात कार्यान्वित होत आहे. त्यामुळे केवळ हिवाळी अधिवेशनापुरते सुरू राहणारे नागपूरचे विधानभवन आता वर्षभर गजबजलेले राहील.
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत, संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत दुपारी १.३० वााजता या कक्षाचे लाेकार्पण होईल.
या नवीन कक्षात दोन उपसचिव, दोन अवर सचिव, दोन कक्ष अधिकारी, दोन सहायक कक्ष अधिकारी, चार लिपिक-टंकलेखक आणि चार
शिपाई असा अधिकारी-कर्मचारीवर्ग असेल. यापुढील काळात विधानभवन, नागपूर येथे विधिमंडळ
समित्यांच्या बैठकादेखील होतील. त्याचप्रमाणे विभागातील दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना अधिवेशनाअगोदर प्रश्न, लक्षवेधी दाखल करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
सदस्य, त्यांचे स्वीय सहायक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी-सदस्य, स्वयंसेवी संस्था, शिक्षण संस्थांमार्फत येणारे अभ्यासगट यांच्यासाठी विधानमंडळातील वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे प्रशिक्षण उपक्रम राबविले जाणार आहेत.