मुंढे यांच्या समर्थनार्थ नागपूर विकास परिषदेचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 09:27 PM2020-07-15T21:27:23+5:302020-07-15T21:29:04+5:30
महापालिका आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे यांच्यावर भाजपाचे नगरसेवक पदाधिकारी खोटे आरोप करीत आहेत. परंतु मुंढे नागपूर शहराच्या विकासासाठी व कोरोना नियंत्रणासाठी प्रभावीपणे काम करीत असल्याचे सांगत त्यांच्या समर्थनार्थ नागपूर विकास परिषदेतर्फे बुधवारी संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे यांच्यावर भाजपाचे नगरसेवक पदाधिकारी खोटे आरोप करीत आहेत. परंतु मुंढे नागपूर शहराच्या विकासासाठी व कोरोना नियंत्रणासाठी प्रभावीपणे काम करीत असल्याचे सांगत त्यांच्या समर्थनार्थ नागपूर विकास परिषदेतर्फे बुधवारी संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.
गेल्या वर्षी नागपूर शहरातील नालेसफाईवर एक कोटीहून अधिक खर्च झाला होता. परंतु तुकाराम मुंढे यांनी यावर्षी ३७ लाख रुपयांमध्ये नालेसफाई केली. प्रभावी उपाययोजना केल्याने नागपूर शहरात कोरोना संसर्ग नियंत्रणात राहिला. १२ क्वारंटाईन सेंटर सुरू केले. खर्च कमी यावा यासाठी राधास्वामी सत्संग मंडळाच्या माध्यमातून मोफत जेवण देण्याची व्यवस्था केली. यात मनपाची मोठी आर्थिक बचत झाली. असे असतानाही मुंढे यांच्यावर खोटे आरोप केले जात असल्याचा आरोप नागपूर विकास परिषदेने केला आहे. तसेच नागपूर शहरातील सिमेंट रोड, टँंकर घोटाळा, सायबर टेक कंपनीचे सर्वेक्षण, कचरा संकलन, पाणीपुरवठा अशा प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.
आंदोलनात नागपूर विकास परिषदेचे संयोजक वेदप्रकाश आर्य, भोला बैसवारे, कमलेश चौधरी, दिलीप जयस्वाल, रवींद्र धीधोडे, अशोक काटले, संजय जयस्वाल, मेहनिस खान, जी.एम. साखरकर, संजय शेवाळे, राजीव जैन, प्रकाश भोयर, रोशन भिमटे, अजय मोहर, दयाल चंदवानी, शरद शाहू, सुधीर पाटील, सूरज मेश्राम, राजू तुलशी, महादेव फुके, सुरेंद्र गढे, दारासिंग कटरे, मोरेश्वर जाधव, मोहित आर्य, बाबाराव गावंडे, अनिल मोटघरे, जितू केवलरामाणी, दिलीप सवरानी आदींचा समावेश होता.