नागपूर ‘सायबर क्राईम’च्या आकडेवारीत ‘व्हायरस’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 10:02 AM2019-05-03T10:02:21+5:302019-05-03T10:03:26+5:30

साधारणत: माहिती अधिकारांतर्गत नेमकी, ठोस व मुद्देसूद आकडेवारी मिळणे अपेक्षित आहे. मात्र नागपूर पोलिसांनी ‘सायबर क्राईम’अंतर्गत एकाच वर्षात दाखल गुन्ह्यांची दोन माहिती अधिकारात वेगवेगळी माहिती देण्याचा प्रताप केला आहे.

Nagpur: 'Virus' in cyber crime statistics? | नागपूर ‘सायबर क्राईम’च्या आकडेवारीत ‘व्हायरस’?

नागपूर ‘सायबर क्राईम’च्या आकडेवारीत ‘व्हायरस’?

Next
ठळक मुद्देएकाच वर्षात दाखल गुन्ह्यांची वेगवेगळी माहिती नेमका आकडा तरी किती ?

योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : साधारणत: माहिती अधिकारांतर्गत नेमकी, ठोस व मुद्देसूद आकडेवारी मिळणे अपेक्षित आहे. मात्र नागपूर पोलिसांनी ‘सायबर क्राईम’अंतर्गत एकाच वर्षात दाखल गुन्ह्यांची दोन माहिती अधिकारात वेगवेगळी माहिती देण्याचा प्रताप केला आहे. २०१५ सालाच्या आकडेवारीत हा घोळ झाला असून या वर्षात ‘सायबर क्राईम’ व ‘आयटी अ‍ॅक्ट’ अंतर्गत नेमके किती गुन्हे दाखल झाले याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. २०१७ मधील माहितीच्या तुलनेत २०१९ मध्ये मिळालेल्या आकडेवारीत गुन्ह्यांची संख्या घटली असल्याने ‘सायबर क्राईम’च्या आकडेवारीत ‘व्हायरस’ तर शिरला नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी २०१७ व २०१९ साली माहिती अधिकारांतर्गत नागपूर पोलिसांकडे माहिती मागविली होती. यात नागपुरात ‘सायबर क्राईम’ व ‘आयटी अ‍ॅक्ट’अंतर्गत किती गुन्हे दाखल झाले, तसेच किती आरोपींना अटक झाली, किती आर्थिक नुकसान झाले इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. पोलीस विभागाकडून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी २०१५ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत नागपूर शहरात ‘सायबर क्राईम’ व ‘आयटी अ‍ॅक्ट’नुसार ३७८ गुन्हे दाखल झाले. यातील १०७ गुन्हे उघडकीस आले व १२३ आरोपींना अटक झाली. मात्र या आकडेवारीवर बारीक नजर टाकली असता २०१५ साली ७१ गुन्हे दाखल झाले होते व ३५ आरोपींना अटक झाली होती. मात्र २०१७ मधील माहिती अधिकारातून प्राप्त माहितीसमवेत चाचपणी केली असता आकडेवारीतील घोळ समोर आला. त्या आकडेवारीनुसार २०१५ साली ‘सायबर क्राईम’ व ‘आयटी अ‍ॅक्ट’नुसार ९८ गुन्हे दाखल झाले होते व २८ आरोपींना अटक झाली होती. या दोन्ही आकड्यांमध्ये तफावत आहे. २०१७ मधील माहितीनुसार २०१५ सालामध्ये ९८ गुन्हे दाखल झाले होते तर २०१९ मधील माहितीत ही संख्या ७१ वर कशी आली. तसेच जर जुन्या माहितीनुसार २०१५ मध्ये २८ आरोपींना अटक झाली होती, तर नव्या माहितीत आरोपींची संख्या अचानक कशी काय वाढली, हे प्रश्न उपस्थित होत आहेत.
वर्षभरात दाखल गुन्ह्यांत ३३ टक्क्यांची वाढ
दरम्यान, गेल्या ५ वर्षांमध्ये उपराजधानीत इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ‘कॅशलेस’च्या युगात आता ‘ई-सेवा’ थेट मोबाईलपर्यंत येऊन पोहोचल्या आहेत. युवापिढीसाठी तर इंटरनेट दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक आहे. परंतु ‘ई-क्रांती’सोबतच ‘सायबर क्राईम’च्या प्रकरणांमध्येदेखील वाढ होत आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये नागपुरात ‘सायबर क्राईम’ किंवा ‘आयटी अ‍ॅक्ट’अंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये वाढ दिसून येत आहे. २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये ३३ टक्क्यांची वाढ दिसून आली. या कालावधीत ‘सायबर’ गुन्ह्यांमुळे ९ कोटी ६९ लाख ३३ हजार ७०२ रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.

Web Title: Nagpur: 'Virus' in cyber crime statistics?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.