नागपुरात ६७ वर्षांत पाचपटींनी मतदार वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 10:19 AM2019-03-15T10:19:09+5:302019-03-15T10:21:40+5:30
लोकसभा निवडणुकांचा शंखनाद झाला असून, निवडणूक आयोगासोबतच विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांकडून मतदानवाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यंदा प्रथमच मतदारांचा आकडा हा २० लाखांच्या पार गेला आहे.
योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकांचा शंखनाद झाला असून, निवडणूक आयोगासोबतच विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांकडून मतदानवाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यंदा प्रथमच मतदारांचा आकडा हा २० लाखांच्या पार गेला आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघाची परंपरा १९५२ सालापासून असून, मतदारांची संख्या सातत्याने वाढतच गेल्याचे दिसून आले. मागील ६७ वर्षांमध्ये मतदारसंघात मतदारांची संख्या ही साडेसतरा लाखांहून अधिक संख्येने वाढली आहे.
१९५२ साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका विदर्भ प्रदेश, मध्य प्रांत आणि बेरार प्रांत असताना झाल्या. त्यावेळी विदर्भात लोकसभेचे आठ मतदारसंघ होते. यातील नागपूर हा मोठ्या मतदारसंघापैकी होता. यात नागपूरसह उमरेड व कामठी यांचादेखील समावेश होता. नागपूर लोकसभा क्षेत्राची एकूण मतदारसंख्या ही ३ लाख ५२ हजार ८७० इतकी होती. १९५७ साली एकूण मतदारांमध्ये केवळ २१ हजारांनी वाढ झाली होती. मात्र त्यानंतर निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीची मोहीम व्यापक करण्यास सुरुवात केली.
१९८४ मध्ये मतदारसंख्या ८ लाख ४५ हजार ८०५ इतकी होती. त्यानंतरच्या पाच वर्षांतच १९८९ मध्ये यात ३ लाख ३७ हजार ८६७ इतकी वाढ झाली व मतदारांची संख्या ११ लाख ८३ हजार ६७२ वर पोहोचली. ३७ वर्षांनी मतदारसंख्या तेव्हा प्रथमच १० लाखांच्या पार गेली होती.
१९९६ मध्ये परत मतदारसंख्येत वाढ दिसून आली. १९९१ च्या तुलनेत मतदारांची संख्या २ लाख ७३ हजार ९५४ वाढली.
१९९९ साली मतदारांचा आकडा १५ लाखांच्या वर गेला. २०१४ मध्ये नागपुरात १९ लाख ७८४ मतदार होते, तर यंदा हाती आलेल्या आकडेवारीनुसार मतदारांची संख्या २१ लाख २६ हजार ५०८ इतकी आहे.
पाच वर्षांत दीड लाखांहून अधिक मतदार वाढले
नागपूर लोकसभा मतदारसंघाची मतदारसंख्या २१ लाख २६ हजार ५०८ आहे. मागील लोकसभा निवडणुकीत १९ लाख ५३ हजार २६६ मतदारसंख्या होती. मागील लोकसभेच्या तुलनेत १ लाख ७३ हजार २४२ मतदारांची भर पडली आहे. यात १० लाख ८० हजार ५७४ पुरुष व १० लाख ४५ हजार ९३४ महिला मतदार आहेत. ६६ तृतीयपंथी आहेत.