खैरलांजी हत्याकांड आंदोलनाचे केंद्र होते नागपूर

By Admin | Published: January 21, 2017 02:28 AM2017-01-21T02:28:18+5:302017-01-21T02:28:18+5:30

नागपूर हे आंबेडकरी चळवळीचे केंद्र म्हणूनच ओळखले जाते. खैरलांजी हत्याकांडानंतर पहिली तीव्र प्रतिक्रिया उमटली

Nagpur was the center of Khalarangi massacre movement | खैरलांजी हत्याकांड आंदोलनाचे केंद्र होते नागपूर

खैरलांजी हत्याकांड आंदोलनाचे केंद्र होते नागपूर

googlenewsNext

पहिली तीव्र प्रतिक्रिया नागपुरातच उमटली
नागपूर : नागपूर हे आंबेडकरी चळवळीचे केंद्र म्हणूनच ओळखले जाते. खैरलांजी हत्याकांडानंतर पहिली तीव्र प्रतिक्रिया उमटली ती नागपुरातच. पुढे या आंदोलनाने देशाच्या सीमाही ओलांडल्या. परंतु आंदोलनाचे मुख्य केंद्र हे नागपूरच होते.
२९ सप्टेंबर २००६ रोजी घडलेले हे अमानुष खैरलांजी हत्याकांड घडले. १ आॅक्टोबरला वृत्तपत्रात बातमी प्रकाशित झाली. २ आॅक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिन होता. सर्व बौद्ध आंबेडकरी बांधव धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात गुंतले होते. ३ तारखेला नागपुरातच समता सैनिक दल व काही आंबेडकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे याकडे लक्ष गेले. काही पदाधिकाऱ्यांनी खैरलांजीला भेट दिली. तेव्हा हा केवळ साधा खून नव्हे तर जातीय मानसिकतेतून करण्यात आलेले हत्याकांड असल्याचे लक्षात आले. येथून ठिणगी पेटली आणि ६ आॅक्टोबरला नागपुरात पहिले तीव्र आंदोलन झाले. त्यानंतर ९ व १४ आॅक्टोबरला या आंदोलनाने तीव्र रूप धारण केले. भैयालाल भोतमांगे यांची पहिली पत्रकार परिषद नागपुरातच ८ आॅक्टोबरला पार पडली. त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा पत्रकारांसमोर संपूर्ण घटनाक्रम विषद केला.
नागपुरात प्रत्येक ठिकाणी आंदोलन झाले. विशेषत: उत्तर नागपूर आणि दक्षिण नागपुरात या आंदोलनाची तीव्रता अधिक होती. आंबेडकरी समाज अक्षरश: रस्त्यावर उतरला होता. येथून हे आंदोलन महाराष्ट्रभर आणि देशात पसरले. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेच्या विरोधातील आंदोलनाची जगानेही दखल घेतली. अनेक देशांमध्ये नागरिकांनी या घटनेचा निषेध नोंदविला. समाजासोबतच सर्व नेतेही आंदोलनात उतरले होते. (प्रतिनिधी)

नागरिकांच्या दर्शनार्थ सीताबर्डी येथील आनंद बुध्द विहारासमोर पार्थिव
भैयालाल भोतमांगे यांचे पार्थिव सध्या मेडिकलमध्येच ठेवण्यात आले आहे. शनिवारी सकाळी ८.३० ते ९ वाजेपर्यंत ते सीताबर्डी येथील आनंद बुध्द विहारा समोर नागरिकांच्या दर्शनार्थ ठेवण्यात येईल, त्यानंतर ते भंडारा येथे रवाना होईल.

मरणोपरांत तरी न्याय मिळावा
संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या खैरलांजी हत्याकांडात एकमेव जिवंत असलेल्या भैयालालचेही आज निधन झाले. भैयालाल हे शेवटच्या क्षणापर्यंत न्यायासाठी समाजाला सोबत घेऊन संघर्ष करीत होते. परंतु त्यांना न्याय मिळाला नाही. त्यांच्या मृत्यूनंतर तरी न्याय मिळावा, अशी अपेक्षा आहे. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे, त्यामुळे न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे.
- प्रा. जोगेंद्र कवाडे
अध्यक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी
व्यवस्थेचे बळी
खैरलांजी हत्याकांडप्रकरणी भैयालाल यांना न्याय मिळाला नाही. न्यायाच्या प्रतीक्षेतच त्यांचे निधन झाले. तब्बल १० वर्षांपासून ते स्वत: आणि आंबेडकरी समाज न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. भैयालाल हे स्वत: त्या घटनेतील मुख्य पीडित होते. त्यांना न्याय मिळाला नाही. ते व्यवस्थेचे बळी ठरले.
- डॉ. प्रदीप आगलावे
ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत
अतिशय दुर्दैवी घटना
खैरलांजी प्रकरणी न्यायाच्या प्रतीक्षेत असतानाच भैयालाल भोतमांगे यांचा मृत्यू होणे ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. आता हा लढा तेवत ठेवून खैरलांजी प्रकरणी न्याय मिळवून देण्याची जबाबदारी समाज व शासनावर येऊन ठेपली आहे. खैरलांजी प्रकरणी न्याय मिळणे ही खरी श्रद्धांजली ठरेल.
-डॉ. नितीन राऊत
माजी पालकमंत्री


कायदेशीर मार्गाने मागितला न्याय
संपूर्ण राज्याला काळीमा फासणाऱ्या खैरलांजी हत्याकांडात एकमेव भैयालाल वाचले, त्यांनी हत्याकांडातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रस्थापित न्यायव्यवस्थेला कायदेशीरमार्गे न्याय मागितला, त्यांचे आज निधन झाले. या घटनेतील आरोपींना फाशीच व्हायला हवी. तेव्हाच खऱ्या अर्थाने भोतमांगे कुटुंबीयांना न्याय मिळेल.
- आमदार प्रकाश गजभिये
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
त्यांना न्यायाची प्रतीक्षा होती
खैरलांजीप्रकरणी झालेले आंदोलन हे न्यायासाठी होते. भैयालाल भोतमांगे हे स्वत: पीडित होते. न्यायाची त्यांना प्रतीक्षा होती. जलद न्यायालयाने दिलेली फाशी, हायकोर्टात रद्द झाली. आता सर्वोच्च न्यायालयात प्रकरण आहे. न्यायाच्या प्रतीक्षेतच भैयालालाचा मृत्यू झाला. आता किमान सर्वोच्च न्यायालयात तरी न्याय मिळावा, अशी अपेक्षा आहे.
- नरेश वाहाणे
अध्यक्ष, रिपब्लिकन मुव्हमेंट
मरेपर्यंत न्याय नाही
खैरलांजी हत्याकांडात भोतमांगे कुटुंबातील चौघांचा खून झाला. त्याप्रकरणी न्याय मिळाला नाहीच. परंतु भैयालाल यांनाही न्याय मिळाला नाही. शासनाने त्यांना चौकीदाराची नोकरी दिली. परंतु वयोमानानुसार लगेच सेवानिवृत्त व्हावे लागले. किमान निकाल लागेपर्यंत एक्स्टेंशन मिळावे, अशी त्यांची मागणी होती. परंतु शासनाने ती सुद्धा मान्य केली नाही.
- उत्तम शेवडे
प्रदेश सचिव, बसपा


पराभवाला हवालदिलपणे पाहणारा
एक सहज साधा माणूस भारतीय व्यवस्थेमध्ये कशा प्रकारे जातीवादाचा बळी पडतो आणि कशा तऱ्हेने आयुष्याची धूळधाण होते. सरकार आपल्या पैशाच्या जोरावर न्यायालयाची एक भ्रामक प्रतिमा सातत्याने गरिबाच्या डोळ्यासमोर ठेवत असते. एक क्षण त्याला सांगून जातो की, ‘कुछ नही हो सकता’. आपल्या पराभवाला हवालदिलपणे पाहात मग त्याचा भैयालाल भोतमांगे होतो.
-अ‍ॅड. विमलसूर्य चिमणकर
केंद्रीय संघटक, समता सैनिक दल
लढाई सुरू ठेवणार
खैरलांजी हत्याकांड प्रकरणी आंबेडकरी समाजाने न्यायासाठी आंदोलन केले. आपणही या आंदोलनात होतो. हायकोर्टापासून ही लढाई धम्मसेनेच्या माध्यमातून लढत आहे. भैयालाल सोबत होता. सर्वोच्च न्यायालयापर्यंत आम्ही ही लढाई घेऊन आलो. संघर्ष अर्ध्यात सोडून भैयालाल गेला. परंतु त्याला न्यााय देण्यासाठी आपण ही लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरूच ठेवू.
- रवि शेंडे
अध्यक्ष, धम्मसेना
हे केवळ शारीरिक मरण
भैयालाल भोतमांगे यांचा मृत्यू हा केवळ शारीरिक आहे. यापूर्वी ते दोनदा मरण पावले. पहिल्यांदा जेव्हा क्रूर जातीयवाद्यांनी त्यांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केले. तेव्हा आणि दुसऱ्यांदा जेव्हा शासनाने त्यांना पैसे व नोकरी देऊन माणुसकीला काळीमा फासणाऱ्या त्या घटनेची नुकसानभरपाई दिली, तेव्हा.
- मिलिंद पखाले
प्रदेश सचिव, भारिप बहुजन महासंघ
आता तरी न्याय मिळावा
भैयालाल भोतमांगे यांना शेवटपर्यंत न्याय मिळाला नाही, शेवटी न्यायाच्या प्रतीक्षेतच त्यांना मृत्यू आला. आता तरी त्यांना न्याय मिळावा. खैरलांजी हत्याकांडानंतर जी आंदोलने झाली त्यातील आंदोलकांवर अनेक गुन्हे दाखल आहेत. ते मागे घेऊन आंदोलकांनाही न्याय द्यावा.
- राजन वाघमारे
शहराध्यक्ष, रिपाइं (आ)
न्याय कधी मिळणार ?
भैयालाल भोतमांगे यांचे न्यायाच्या प्रतीक्षेत निधन झाले. न्याय मिळाला नाही. खैरलांजी हत्याकांडाचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. न्यायालयावर आमचा विश्वास आहे. परंतु आणखी किती दिवस लागणार.
- बाळू घरडे
रिपाइ

Web Title: Nagpur was the center of Khalarangi massacre movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.