वेकोलिमुळे नागपूरकरांना मिळेल मुबलक पाणी

By Admin | Published: April 11, 2017 01:55 AM2017-04-11T01:55:17+5:302017-04-11T01:55:17+5:30

महाजेनकोद्वारे वीजनिर्मितीसाठी पेंच प्रकल्पातील पाणी वापरले जाते. वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड(वेकोली)ने नुकताच महाजेनकोशी करार केला आहे.

Nagpur Water Resource | वेकोलिमुळे नागपूरकरांना मिळेल मुबलक पाणी

वेकोलिमुळे नागपूरकरांना मिळेल मुबलक पाणी

googlenewsNext

सीएमडी राजीव रंजन यांची माहिती : महाजेनको व सरकारशी करार
नागपूर : महाजेनकोद्वारे वीजनिर्मितीसाठी पेंच प्रकल्पातील पाणी वापरले जाते. वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड(वेकोली)ने नुकताच महाजेनकोशी करार केला आहे. याअंतर्गत वेकोलि १८ हजार गॅलन प्रति मिनिट पाणी महाजेनकोला पुरविणार आहे. त्यामुळे पेंचमधून महाजेनकोला जाणारे पाणी सिंचन व पिण्यासाठी उपलब्ध होईल. त्यामुळे नागपूरकरांना अधिक पाणी मिळेल, अशी माहिती डब्ल्यूसीएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्रा यांनी दिली. याशिवाय नागपूरसाठीही पाणी उपलब्ध करण्याची क्षमता वेकोलिकडे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
टिळक पत्रकार भवन ट्रस्टतर्फे आयोजित मीट दि प्रेस कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, वेकोलिच्या महाराष्ट्रातील विविध खाणीमधून दररोज निघणारे ६ कोटी गॅलन म्हणजे ३० कोटी लिटर पाणी वाया जात होते. त्यावर प्रक्रिया करून ते आता पिण्यासाठी, सिंचनासाठी वापरणे शक्य झाले आहे. आतापर्यंत वेकोलिचे पाणी बोरगाव सिंचन प्रकल्पाला दिले गेले, शिवाय नीलगाव येथे पिण्यासाठी आॅरो प्लान्ट स्थापन करून २४ तास पाणी उपलब्ध करून देण्यात आले. पाटणसावंगीजवळ येत्या सहा महिन्यात असाच प्रकल्प स्थापन करून आसपासच्या गावात पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. राज्य शासनासोबत याबाबत नवा करार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी वेकोलिचे संचालक संजय कुमार, ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, ब्रह्माशंकर त्रिपाठी, जोसेफ राव, अतुल पांडे आदी उपस्थित होते.
२०१९-२० पर्यंत ६० लाख टन कोळसा उत्पादन
गेल्या काही वर्षांत महाजेनकोसारख्या कंपन्यांची मागणी कमी झाल्याने कोळशाचे उत्पादन धोक्याच्या पातळीपर्यंत घटल्याने कर्ज आणि तोटा वाढला होता. मात्र अडीच वर्षांत तोटा भरून काढण्यात मोठे यश आले आहे. वेकोलिने केवळ मार्च महिन्यात ३.३६ लाख टन कोळशाचे उत्पादन करून ५६ टक्क्यांची विक्रमी वाढ केली. याअंतर्गत २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत वेकोलिने ४५.६३ लाख टन कोळशाचे उत्पादन केले आहे. प्रस्तावित असलेल्या ३० पैकी १८ नव्या खाणी सुरू केल्या असून, त्यातून ३७.८९ लाख टन प्रति वर्ष उत्पादन सुरू केले आहे. आणखी १८ खाणी प्रस्तावित असल्याचे राजीव रंजन यांनी सांगितले. २०१९-२० पर्यंत वेकोलिचे कोळसा उत्पादन ६० लाख टनापर्यंत नेण्याचे लक्ष्य निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राबाहेर नवीन प्रकल्पासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविला असून, परवानगी मिळाल्यास कोळसा उत्पादन एक कोटी टनाच्यावर जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.(प्रतिनिधी)

नागपूर जिल्ह्यात पाच नवे प्रकल्प
वेकोलितर्फे नुकताच महाजेनकोशी करार करण्यात आला आहे. महाजेनको आतापर्यंत महानदी कोलफील्ड्सकडून कोळसा खरेदी करीत होते. मात्र यानंतर वेकोलितर्फे त्यांना पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी वेकोलिने कामठी, गोंडेगाव, भानेगाव, इंदर व सिंगुरी येथे पाच नवे कोळसा प्रकल्प सुरू केले आहेत. या प्रकल्पामधून पाईप कन्व्हेयर या नव्या पद्धतीने कोराडी व खापरखेडा विद्युत प्रकल्पासाठी कोळसा पुरविला जाईल. या खाणी वीज प्रकल्पाच्या जवळ असल्याने वाहतुकीचा खर्च वाचेल, शिवाय नव्या पद्धतीमुळे प्रदूषणही होणार नाही, अशी माहिती राजीव रंजन यांनी यावेळी दिली.

Web Title: Nagpur Water Resource

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.