नागपूर विणकर सहकारी सूतगिरणी न्यायालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 10:41 PM2019-07-11T22:41:07+5:302019-07-11T22:43:15+5:30
उमरेड रोडवरील मौजा हरपूर येथील ४५.५० एकर जमिनीसाठी नागपूर विणकर सहकारी सूतगिरणी आणि गिरणीचे सदस्य भास्कर मौंदेकर, पुरुषोत्तम मौंदेकर, मुरलीधर मौंदेकर व पुरुषोत्तम बाजीराव यांनी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उमरेड रोडवरील मौजा हरपूर येथील ४५.५० एकर जमिनीसाठी नागपूर विणकर सहकारी सूतगिरणी आणि गिरणीचे सदस्य भास्कर मौंदेकर, पुरुषोत्तम मौंदेकर, मुरलीधर मौंदेकर व पुरुषोत्तम बाजीराव यांनी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. ही जमीन गिरणीच्या मालकीची असल्याचे घोषित करण्यात यावे, या जमिनीसोबत तृतीय पक्षाचा संबंध निर्माण करण्यास कायमची मनाई करण्यात यावी यासह विविध मागण्या सदरहू दाव्यामध्ये करण्यात आल्या आहेत.
न्यायालयाने राज्य सरकार, सहकारी संस्था निबंधक, महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे अध्यक्ष, म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांच्यासह इतर प्रतिवादींना नोटीस बजावून स्वत:ची बाजू मांडण्यासाठी हजर होण्याचा आदेश दिला आहे. प्रकरणावर २२ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे. नागपूर विणकर सहकारी सूतगिरणी १९६४ मध्ये कार्यान्वित झाली होती. गिरणीत कापड तयार केले जात होते व तेथे ११०० कर्मचारी कार्यरत होते. दरम्यान, गिरणीच्या विनंतीवरून राज्य सरकारने गिरणीसाठी १०२.१७ एकर जमीन दिली होती. त्याविषयी ९ एप्रिल १९६४ रोजी जीआर जारी करण्यात आला होता. त्यानंतर १५ डिसेंबर १९६५ रोजी भूसंपादन अधिकाऱ्याने गिरणीला यातील ८८.०३ एकर जमीन हस्तांतरित केली व त्यासंदर्भात तहसीलदाराने ४ मे १९९६ रोजी आदेशही जारी केला. गिरणीने जमिनीच्या मोबदल्यात सरकारला ४ लाख ९६ हजार ७७२.१२ रुपये दिले व जमिनीच्या रेकॉर्डवर स्वत:चे नाव चढवले. असे असताना जिल्हाधिकाऱ्यांनी गिरणीशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता यातील ४५.५० एकर जमीन विविध संस्थांना लीजवर दिली. ही कृती अवैध असल्याचे गिरणी व इतर दावाकर्त्यांचे म्हणणे आहे. ही जमीन बळकावण्यासाठी राजकीय शक्ती जोर लावत असल्याचा आरोपही त्यांनी दाव्यात केला आहे.