नागपूर ग्रोथ इंजिन ठरेल : नितीन गडकरी यांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 12:12 AM2019-04-09T00:12:52+5:302019-04-09T00:14:12+5:30
गेल्या पाच वर्षांत नागपूरचा चेहरामोहरा बदलला आहे. शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा माझा प्रयत्न आहे. हे शहर देशात एक नंबरचे शहर बनवून दाखविण्याचे माझे स्वप्न असून, येणाऱ्या पाच वर्षांत नागपूर देशाच्या विकासात ग्रोथ इंजिन ठरेल, असा दावा केंद्रीय मंत्री व नागपूर लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या पाच वर्षांत नागपूरचा चेहरामोहरा बदलला आहे. शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा माझा प्रयत्न आहे. हे शहर देशात एक नंबरचे शहर बनवून दाखविण्याचे माझे स्वप्न असून, येणाऱ्या पाच वर्षांत नागपूर देशाच्या विकासात ग्रोथ इंजिन ठरेल, असा दावा केंद्रीय मंत्री व नागपूर लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांनी केला.
मानेवाडा येथे त्यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजी खासदार दत्ता मेघे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, आमदार सुधाकर कोहळे, सुलेखा कुंभारे, प्रकाश जाधव, मोहन मते, अशोक मानकर, संजय भेंडे, शेखर सावरबांधे, राजेश तुमसरे, नगरसेवक सतीश होले, छोटू भोयर, किशोर कुमेरिया, मंगला खेकरे, माधुरी ठाकरे, वंदना भगत, विशाखा बांते, भारती बुंदे, स्नेहल बिहारे, नीता मुळे, राजेंद्र सोनकुसरे, अभय गोटेकर, बळवंत जिचकार, रमेश सिंगारे, राजू बहादुरे, भूपेश थूलकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, येणाऱ्या मार्च महिन्यापर्यंत शहरातील सर्व भागात २४ तास पाणी मिळेल. ३५ बस बायोगॅसवर चालेल, २५० इलेक्ट्रिकच्या टॅक्सी धावेल, तेलंखेडी येथे जगातले सर्वात मोठे म्युझिकल फाऊंटेन बनेल, नागपूरची मेट्रो ब्रॉडगेज बनेल, येणाºया वर्षात मिहानमध्ये २५ हजार लोकांना रोजगार, पुढच्या ३ ते ४ वर्षात ५० हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल. मोठमोठ्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून नागपूरच्या विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाचे दरवाजे खुले झाले आहे. जात, धर्म, भाषा, पार्टीचा विचार न करता नागपूरचा चौफेर विकास करण्यात यश आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
केवळ नागपूरच नाही तर देशभरात विकासकामे केली आहे. गंगेला अविरल निर्मळ बनविण्याचे काम केले आहे. गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्रीला जोडणारा रस्ता १२ हजार कोटी रुपये खर्च करून बांधायला घेतला. बुद्धांच्या १० श्रद्धास्थळाशी संबंधित बौद्ध सर्किटच्या रूपाने १० हजार कोटी रुपयांचे रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. पंढरपूरपासून आळंदी, देहूपासून पंढरपूरपर्यंत पालखी मार्ग मंजूर झाले. शेगावपासून पंढरपूरपर्यंत चार पदरी रस्ता पूर्ण झाला आहे. लंडनमध्ये बाबासाहेबांचे घर घेतले. इंदू मिलची जागा स्मारकाला दिली. महुला बाबासाहेबांचे स्मारक तयार केले आणि आता यशवंत स्टेडियमवर स्मारक बांधतो आहे. कुठल्याही जातीधर्माचा भेदभाव न करता हे काम करीत आलो असल्याचे गडकरी म्हणाले.