नागपूरला ‘नंबर वन’ बनविणार
By admin | Published: February 12, 2017 02:35 AM2017-02-12T02:35:07+5:302017-02-12T02:35:07+5:30
नागपूर शहरात मेट्रो रेल्वे, एम्स, मिहान, आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिम्बॉयसिस, सीएनजीवर धावणाऱ्या बसेस, सिमेंट रस्ते,
नितीन गडकरी यांची ग्वाही : शुक्रवार तलावात ‘सीप्लेन’ उतरणार
नागपूर : नागपूर शहरात मेट्रो रेल्वे, एम्स, मिहान, आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिम्बॉयसिस, सीएनजीवर धावणाऱ्या बसेस, सिमेंट रस्ते, २४ बाय ७ पाणी पुरवठा योजना, कचऱ्यापाासून वीजनिर्मिती, असे विविध विकास प्रकल्प उभे राहत आहेत. यातून पुढील पाच वर्षांत ५० हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार असून, विकासाच्या बाबतीत नागपूर शहर हे देशातील ‘नंबर वन’विकसित शहर होईल. अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी दिली. महापालिका निवडणुकीतील पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कापसे व वैष्णवदेवी चौकात गडकरी यांनी जाहीर सभा घेतल्या.
शहरातील दूषित पाण्याचा पुनर्वापर करून महापालिकेला वर्षाला १८ कोटींचे उत्पन्न प्राप्त होत आहे. भांडेवाडी येथे वीज प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सिम्बॉयसिसमध्ये स्थानिक विद्यार्थ्यांना २५ टक्के प्रवेश, पारडी भागात ४५० क ोटींची विकास कामे हाती घेण्यात आली आहेत.
यात उड्डाणपूल, रस्ते, हरिहर मंदिर ते शांतिनगर दरम्यान उड्डाणपूल उभारला जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून २ लाख ५० हजार बेघर लोकांना घरे देण्यात येतील. विविध योजनांतून ६० हजार लोकांवर हृदय शस्त्रक्रिया तर २८ हजार लोकांवर किडनी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तसेच शुक्रवारी तलावात सीप्लेन उतरविण्यात येणार असल्याची घोषणा गडकरी यांनी केली.
तिकीट वाटपात काही कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. याची मला जाणीव आहे. परंतु तरीही सर्वजण कामाला लागले असून, सर्वांनी महापालिकेत भाजपची सत्ता आणण्याचा संकल्प केल्याची माहिती गडकरी यांनी दिली. व्यासपीठावर आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे व गिरीश व्यास यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)