...तर नागपूर देशाचे क्रीडा ‘हब’ होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 07:03 AM2019-01-26T07:03:03+5:302019-01-26T07:05:12+5:30

शहरात ३५० मैदाने तयार करणार असल्याचे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले आहे. नवीन पिढीला खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध झाली तर निश्चितच उपराजधानीमध्ये क्रीडासंस्कृती निर्माण होईल.

... Nagpur will be the sports hub of the country | ...तर नागपूर देशाचे क्रीडा ‘हब’ होईल

...तर नागपूर देशाचे क्रीडा ‘हब’ होईल

googlenewsNext
ठळक मुद्देखासदार क्रीडा महोत्सवाचा थाटात समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात ३५० मैदाने तयार करणार असल्याचे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले आहे. नवीन पिढीला खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध झाली तर निश्चितच उपराजधानीमध्ये क्रीडासंस्कृती निर्माण होईल. येथून आणखी चांगले, दर्जेदार खेळाडू घडतील व नागपूर देशाचा क्रीडा ‘हब’ म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास ‘आयसीसी’चे (इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल) अध्यक्ष अ‍ॅड.शशांक मनोहर यांनी व्यक्त केला. खासदार क्रीडा महोत्सवाचा शुक्रवारी थाटात समारोप झाला. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.
मानकापुर क्रीडा संकुल येथे झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, खा.विकास महात्मे, माजी खासदार दत्ता मेघे, आ.सुधाकर कोहळे, अनिल सोले, सुधाकर देशमुख, मिलिंद माने, माजी आमदार आशिष जयस्वाल, अशोक मानकर, महापौर नंदा जिचकार, मनपाचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी प्रामुख्याने उपस्थित होते. शहरात आवश्यक त्या प्रमाणात क्रीडांगणे तयार झाली तर खरोखरच क्रीडाक्षेत्राला एक वेगळी दिशा मिळेल. नितीन गडकरी हे जे बोलतात ते करतात. इतर नेत्यांप्रमाणे केवळ आश्वासने देत नाहीत. नव्या खेळाडूंना मंच प्रदान करणारा हा क्रीडा महोत्सव असाच सुरू ठेवावा, असे प्रतिपादन अ‍ॅड. मनोहर यांनी केले.
तत्पूर्वी संदीप जोशी यांनी प्रास्ताविकातून महोत्सवातील एकूण कामगिरीवर प्रकाश टाकला. दरम्यान, यावेळी क्रीडा क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या १९ क्रीडापटूंना मान्यवरांच्या हस्ते क्रीडाभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार सोहळ्यानंतर प्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम याच्या ‘लाईव्ह कॉन्सर्ट’ने कार्यक्रमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.

सोनू निगमने ‘मौसम’ केला ‘मस्ताना’
‘यंगिस्तान’पासून ते थेट जुन्या पिढीतील नागरिकांना वेड लावणारा बॉलिवूडचा प्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम याचा शुक्रवारी खासदार क्रीडा महोत्सवात आयोजित ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’ नागपूरकर रसिकांसाठी अविस्मरणीय ठरला. अगोदरच पावसामुळे ‘रोमँटिक’ झालेल्या वातावरणात ‘दिवाना’ बनून अवतरलेल्या सोनू निगमच्या स्वरधारांनी सभागृहातील प्रत्येक रसिक अक्षरश: ‘मस्ताना’ झाला. रसिकांनी खचाखच भरलेल्या मंतरलेल्या वातावरणात ‘क्रेझी दिल मेरा’ म्हणत त्याने सप्तसुर लावला अन् स्वरमैफिलीत आलेला प्रत्येक ‘मुसाफिर’ संगीताच्या दुनियेत हरविला. गायनाच्या क्षेत्रात कितीही बदल झाला असला तरी आपल्या स्वरवैभवाने आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असलेल्या सोनू निगमने आपल्या ‘रुमानी’ आवाजाने नागपूरकरांना संगीताची एक वेगळीच अनुभूती दिली. सोनू नागपुरात बेफाम गायला आणि त्याच्या गायनाच्या कैफात आकंठ बुडालेल्या रसिकप्रेक्षकांनी कधी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करीत तर कधी त्याच्या शब्दावर ताल धरीत त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘दिवाना तेरा...’, ‘हस मत पगली प्यार हो जाएगा’, ‘कभी अलविदा ना कहना’, ‘अब मुझे रात दिन..’ या गाण्यांनी रसिकांना वेड लावले. तर ‘सूरज हुआ मध्धम’ या गाण्याने अनेकांच्या ह्रद्यांच्या तारा वाजायला सुरुवात झाली. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला कार्यक्रम होत असल्याने सोनूने ‘मेरा रंग दे बसंती चोला..’चे सादरीकरण केले आणि चहूबाजूने ‘भारत माता की जय’चे नारे लागले. ‘कॉन्सर्ट’मध्ये अनेक एकाहून एक ‘हीट’ गाणी म्हणत उपस्थितांचा जोश आणखी वाढविला. मान्या नारंग हिने ‘कॉन्सर्ट’च्या सुरुवातीला ‘चली रे..’,‘लैला ओ लैला’ ही गाणी गायली.

Web Title: ... Nagpur will be the sports hub of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.