नागपूर देशातील ‘टॉप स्मार्टसिटी’ होईल - नंदा जिचकार
By admin | Published: March 10, 2017 06:16 PM2017-03-10T18:16:47+5:302017-03-10T18:16:47+5:30
महापालिकेच्या माध्यमातून दोन वर्षात नागपूर देशातील टॉप स्मार्ट सिटी होईल. अशी ग्वाही महापौर नंदा जिचकार यांनी दिली.
Next
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 10 - शहरातील जनतेने विश्वासाने सलग तिस-यांदा भाजपाच्या हाती महापालिकेची सत्ता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपराजधानीच्या चौफेर विकासासाठी धडपड करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात महापालिकेच्या माध्यमातून दोन वर्षात नागपूर देशातील टॉप स्मार्ट सिटी होईल. अशी ग्वाही महापौर नंदा जिचकार यांनी दिली. शुक्रवारी त्यांनी लोकमत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी त्यांनी शहर विकासाच्या विविध विषयावर दिलखुलास चर्चा केली.
महापालिकेचा कारभार लोकाभिमुख व पारदर्शी व्हावा. या दृष्टीने प्रयत्न राहील. विकासासोबत शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध होतील. यासाठी नियोजन सुरू आहे. सोबतच महापालिकेची आर्थिक बाजू सक्षम करण्याच्या दृष्टीने उत्पन्नाचे नवीन स्त्रोत शोधले जातील. ऑरेंज सिटी स्ट्रीट, इतवारी भागात व्यापारी संकूल उभारण्याचा प्रयत्न आहे. यासोबतच प्रस्तावित प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे. मालमत्ता कर, पाणीपट्टी व नगररचना विभागाच्या वसुलीवर भर देण्याचा मनोदय जिचकार यांनी व्यक्त केला.
दलित व अल्पसंख्यक महिलांना सक्षम करू
भाजपाने निवडणुकीच्यावेळी जाहीरनामा दिला आहे. त्यानुसार दलित व अल्पसंख्यक समाजातील महिलांपुढे गंभीर आर्थिक समस्या आहे. शिक्षण असले तरी नोकरी मिळेलच याची शाश्वती नाही.याचा कुटंबासोबतच समाजावरही परिणाम होतो. याचा विचार करता केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना प्राधान्याने राबवून या समाजातील महिलांना सक्षम करू अशी ग्वाही नंदा जिचकार यांनी दिली.