नागपुरात लवकरच महिलांसाठी ‘इलेक्ट्रिक बस’ येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 09:50 AM2018-03-17T09:50:18+5:302018-03-17T09:50:29+5:30

राज्य सरकारच्या तेजस्विनी योजनेंतर्गत नागपूर महापालिकेतर्फे चालविण्यात येणाऱ्या ‘आपली बस’च्या ताफ्यामध्ये खास महिलांसाठी लवकरच ‘इलेक्ट्रिक बस’ दाखल होणार आहे.

Nagpur will soon have 'electric bus' for women | नागपुरात लवकरच महिलांसाठी ‘इलेक्ट्रिक बस’ येणार

नागपुरात लवकरच महिलांसाठी ‘इलेक्ट्रिक बस’ येणार

Next
ठळक मुद्दे‘तेजस्विनी’अंतर्गत सहा बसची होणार खरेदीवाहक व चालकही महिलाच

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य सरकारच्या तेजस्विनी योजनेंतर्गत नागपूर महापालिकेतर्फे चालविण्यात येणाऱ्या ‘आपली बस’च्या ताफ्यामध्ये खास महिलांसाठी लवकरच ‘इलेक्ट्रिक बस’ दाखल होणार आहे. याअंतर्गत सहा इलेक्ट्रिक बसची खरेदी होणार असून महिलांच्याच हस्ते या बसचे लोकार्पण होणार आहे. महापालिकेच्या मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात शुक्रवारी परिवहन समितीची बैठक झाली. ती यासंदर्भातील विषयाला मंजुरी देण्यात आली. यासंदर्भात बैठकीत अधिक माहिती देताना समितीचे सभापती बंटी कुकडे म्हणाले, ‘आपली बस’च्या ताफ्यात दाखल होणाऱ्या या सर्व इलेक्ट्रिक बसेस महिलांना समर्पित राहील. या बसेस महिला सुरक्षेच्या दृष्टीने परिपूर्ण असतील. महिलांसाठी आवश्यक सर्व सोयी त्यात असतील. या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे राहणार असून ते पूर्ण वेळ कार्यान्वित असतील. महिला विशेष बसमधील वाहकही महिलाच राहणार असून बसच्या चालकही महिलाच राहतील, यादृष्टीने आपले प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या बसमुळे मनपाच्या परिवहन विभागाचा आर्थिक तोटा कमी करण्यास मदत होणार आहे. कारण या बस पूर्णपणे इलेक्ट्रिक चार्जिंगवर चालणार आहेत. त्यामुळे डिझेलच्या खर्चाची बचत होणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटविणाऱ्या महिला, गरीब होतकरू विद्यार्थिनी यांच्या हस्ते या बसेसचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती सभापती बंटी कुकडे यांनी यावेळी दिली.
बैठकीला समितीचे उपसभापती प्रवीण भिसीकर, सदस्य अभिरूची राजगिरे, अर्चना पाठक, उज्ज्वला शर्मा, मनिषा धावडे, विद्या मडावी, नरेंद्र वालदे, नितीन साठवणे, वैशाली रोहणकर, कल्पना कुंभलकर, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, श्रम अधिकारी अरुण पिपरुडे, लेखाधिकारी विनय भारद्वाज, वाहतूक व्यवस्थापक सुकीर सोनटक्के, अतांत्रिक पर्यवेक्षक रामराव मातकर उपस्थित होते.

नगरसेवक तपासणार बस तिकीट
सध्या शहरातील रस्त्यांवर ‘आपली बस’च्या ३७० बस धावत आहेत. मात्र, महापालिकेच्या लेखी प्रवासी वाढलेले नाहीत व उत्पन्नातही वाढ झालेली नाही. दररोज तोट्यात वाढ होत आहे. त्यामुळे आता तिकिटांपासून येणारी कमाई वाढविण्यालाठी व बस फेऱ्यांची अनियमितता रोखण्यासाटी परिवहन विभागाने एक नवा फॉर्म्युला तयार केला आहे. परिवहन समितीचे सदस्य असलेल्या नगरसेवकांना विभाग व समितीच्या सहकार्याने ओळखपत्र दिले जात आहे. या ओळखपत्राच्या आधारे ते शहरातील कोणत्याही मार्गावर कोणत्याही बसमध्ये तिकिटांचा व प्रवाशांचा हिशेब घेऊ शकतील. परिवहन व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी आयबीटीएम आॅपरेटर डिम्ट्सची नियुक्ती करण्यात आली. मात्र, त्यांच्याकडे फक्त ४८ चेकर आहेत. दररोज ३७० बसच्या ४८१२ फेऱ्या होतात. आधीच कर्मचाऱ्यांच्या हातमिळवणीतून लाखो रुपयांचा कॅशकार्ड घोटाळा झाला आहे. ३५ वाहकांवरही कारवाई करण्यात आली आहे. विभागातर्फे भरारी पथके नेमण्यात आली आहेत. मात्र, त्याचाही फायदा होताना दिसत नाही. त्यामुळे आता सदस्यांनाच तिकीट तपासणीसाठी मैदानात उतरविले जाणार आहे.

Web Title: Nagpur will soon have 'electric bus' for women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.