नागपूर रात्रभर जागणार!
By admin | Published: July 1, 2016 03:05 AM2016-07-01T03:05:40+5:302016-07-01T03:05:40+5:30
केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी नाईटलाईफला ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यानुसार नवीन आदर्श गुमास्ता कायद्यांतर्ग
थिएटर, हॉटेल्स, दुकाने, बँका अहोरात्र
खुली राहणार : व्यावसायिकांचा फायदा
नागपूर : केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी नाईटलाईफला ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यानुसार नवीन आदर्श गुमास्ता कायद्यांतर्गत थिएटर, हॉटेल्स, दुकाने, बँकांना अहोरात्र उघडी ठेवण्यात मुभा मिळणार आहे. या निर्णयामुळे रस्त्यांवर चहलपहल वाढून नागपूर रात्रभर जागणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची उलाढाल वाढून तरुण-तरुणींसाठी रोजगाराच्या अनेकविध संधी उपलब्ध होणार आहेत. या निर्णयाचे विविध सामाजिक संघटना आणि व्यापाऱ्यांनी स्वागत केले आहे.
शासनाच्या महसुलात
वाढ होणार
सर्व प्रतिष्ठाने अहोरात्र सुरू राहणार असल्यामुळे व्यावसायिकांची उलाढाल वाढून शासनाच्या तिजोरीत कर स्वरूपातील महसुलात वाढ होईल. त्याचा राज्याच्या विकासात हातभार लागणार आहे. एवढेच नव्हे तर विजेची मागणी वाढल्यामुळे महावितरणला फायदा होणार आहे. एकंदरीत पाहता या निर्णयामुळे उलाढालीच्या आधारावर शासनाचा महसूल वाढणार आहे.
पोलिसांची जबाबदारी वाढणार
प्रत्येक घडामोडीला चांगली अन् वाईट अशा दोन बाजू असतात. काही नुकसान होते तर काही फायदेही होतात. रात्रभर दुकाने, मॉल्स, बँका तसेच इतर आस्थापना उघड्या राहिल्याने रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध असतील. मात्र, सुरक्षेचाही मुद्दा उपस्थित होईल. पोलिसांना अधिक सतर्कपणे काम करावे लागेल, असे मत निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. अंकुश धनविजय यांनी व्यक्त केले. अनेकदा रस्त्यावर वर्दळ दिसली की गुन्हेगार गुन्हा करण्याची हिंमत दाखवत नाही. ‘नाईट लाईफ’मुळे रस्त्यावर वर्दळ वाढेल.
रोजगाराच्या नवीन संधी
केंद्राच्या निर्णयामुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहे. दोन पाळीत काम करून अनेकांना उत्पन्न वाढविता येणार आहे. याशिवाय तरुण-तरुणींना शिक्षणासोबतच उत्पन्नासाठी रोजगाराची द्वारे खुली होणार आहे. तरुणांना रेस्टॉरंट, दुकाने, थिएटर, मॉल या ठिकाणी रात्री १० ते सकाळी ६ आणि फावल्या वेळात रोजगार मिळणार आहे.
व्यावसायिकांची उलाढाल वाढणार
रेस्टॉरंट, दुकाने, मॉल रात्री ११ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी आहे. पण आता आदर्श गुमास्ता कायद्यामुळे सर्व प्रतिष्ठाने अहोरात्र सुरू राहतील. त्यामुळे व्यावसायिकांची उलाढाल वाढणार आहे. एखाद्याला दुपारी खरेदी शक्य न झाल्यास त्याला रात्री खरेदी करता येईल. त्यामुळे मॉल संस्कृती वाढणार असून त्याचा ग्राहकांना निश्चितच फायदा होणार आहे. विशेष म्हणजे गोदामे आणि पॅकेजिंगचे काम चालणाऱ्या ठिकाणी रात्रीच्या वेळात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. महिलांनाही रात्रपाळीत काम करता येणार आहे.