नागपूर हिवाळी अधिवेशन २०२१; दोन डोसनंतरही करावी लागणार आरटीपीसीआर टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 08:28 PM2021-10-18T20:28:00+5:302021-10-18T20:32:57+5:30
Nagpur News सात डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे कोविडच्या काटेकोर नियमात होईल. विधानभवनात येणाऱ्या प्रत्येकाला आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे.
नागपूर : सात डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे कोविडच्या काटेकोर नियमात होईल. विधानभवनात येणाऱ्या प्रत्येकाला आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. कोविड प्रतिबंधित लसीचे दोन डोस घेतले असेल तरीही आरटीपीसीआर टेस्ट करावी लागेल. सभागृहात सदस्यांना एक सीट सोडून बसावे लागेल. सदस्यांच्या खासगी सचिवांना व अन्य लोकांना विधानभवन परिसरात प्रवेश राहणार नाही. सीमित लोकांनाच प्रवेश दिला जाईल.
हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसंदर्भात सोमवारी विधानभवनात विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत ही माहिती देण्यात आली. या बैठकीला विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे- वर्मा, जिल्हाधिकारी विमला आर., नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागूल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल उपस्थित होते.
भागवत यांनी यावेळी आरोग्य विभागाला आमदारांपासून त्यांच्या खासगी सचिव, अधिकारी-कर्मचारी, प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी, पोलीस कर्मचारी आणि वाहनचालक यांची आरटीपीसीआर टेस्ट हे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी करून घेण्याचे निर्देश दिले. विधानभवनात येणाऱ्यांना कोविडचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र ठेवणे सोबत आवश्यक राहील.
यावेळी विधानमंडळाच्या नवीन इमारतीची सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासह संपूर्ण विधानभवन परिसर, आमदार निवास, १६० खोल्यांचे गाळे, सुयोग भवनाच्या सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेण्यात आला.
विधान परिषद सभापतींचे सचिव म. मु. काज, उपसचिव राजेश तारवी, अवर सचिव रवींद्र जगदाळे, महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अनिल महाजन, विधानभवनाचे मुख्य सुरक्षा अधिकारी प्रदीप चव्हाण, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी तथा व सचिव सुनील झोरे, विधानभवनाच्या वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक नीलेश मदाने, विधिमंडळाचे पद्धती विश्लेषक अजय सर्वणकर हेसुद्धा यावेळी उपस्थित होते.
आमदार निवासातील एक मजला महिला आमदारांसाठी
राजेंद्र भागवत यांनी यावेळी आमदार निवासातील एक मजला हा महिला आमदारांसाठी आरक्षित ठेवणे व तिथे विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे निर्देश दिले. आमदार निवास येथून कोविड केअर सेंटर हटवून संपूर्ण इमारत व परिसर सॅनिटाइज करण्याच्या सूचनाही दिल्या. पार्किंग, दूरसंचार, वाहन व्यवस्था, वीज पुरवठा, इंटरनेट, अग्निशमन, रेल्वे आरक्षण, खानपान आदी व्यवस्थेचा आढावाही घेण्यात आला.