नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; बंदोबस्तातील पोलिसांसाठी अवघ्या १० रुपयात जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 02:56 PM2019-12-16T14:56:50+5:302019-12-16T15:02:05+5:30
नागपूर हिवाळी अधिवेशनात बंदोबस्तासाठी राज्यभरातून आलेल्या पोलिसांच्या जेवणाचा बंदोबस्त नागपूर शहर पोलिसांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: : नागपूर हिवाळी अधिवेशनात बंदोबस्तासाठी राज्यभरातून आलेल्या पोलिसांच्या जेवणाचा बंदोबस्त नागपूर शहर पोलिसांनी केला आहे. गोंडराजाचा पुतळा असलेल्या विधानसभा चौकात पोलिसांनी बुफे पद्धतीने जेवण वितरीत केले. हे जेवण अवघ्या १० रुपयात सर्व पोलिसांना देण्यात आले. जेवणाचा दर्जा कसा काय आहे हे पाहण्यासाठी खुद्द पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय जातीने हजर होते. त्यांनी पदार्थांची चव चाखून समाधान व्यक्त केले. त्यांनी स्वत: पोलिसांना जेवण वाढलेदेखील.
हे जेवण घेतल्यानंतर बाहेर गावाहून आलेल्या पोलिसांनीही जेवणाच्या दर्जा व चवीबद्दल अतिशय समाधानकारक प्रतिक्रिया दिल्या. असे जेवण तर घरीदेखील मिळत नाही, असेही काहींनी म्हटले. बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना दहा रुपयात पोटभर जेवण या संकल्पनेचे सर्वांनी स्वागत व कौतुक केले आहे.