नागपूर हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरनंतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 08:51 PM2019-11-27T20:51:19+5:302019-11-27T20:51:41+5:30
राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अखेर सुटला असून नवे सरकार स्थापन होत आहे. त्यामुळे नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या तयारीलाही जोर चढला असून, डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात (१६ डिसेंबरनंतर) हिवाळी अधिवेशन होणार असल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अखेर सुटला असून नवे सरकार स्थापन होत आहे. त्यामुळे नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या तयारीलाही जोर चढला असून, डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात (१६ डिसेंबरनंतर) हिवाळी अधिवेशन होणार असल्याची माहिती आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जाहीर केल्यानुसार नागपुरातील हिवाळी अधिवेशन हे ९ डिसेंबरपासून होणार होते. प्रशासकीय निवडणूक संपताच अधिवेशनाच्या तयारीला सुरुवातसुद्धा झाली होती. परंतु महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा निर्माण झाल्याने अधिवेशनाच्या तयारीची गती मंदावली होती. परंतु आता सत्ता स्थापनेचा तिढा सुटला आहे. गुरुवारी नवे सरकार स्थापन होणार आहे. तेव्हा हिवाळी अधिवेशनाच्या तयारीलाही जोर चढला आहे. परंतु ९ डिसेंबर रोजी होणारे अधिवेशन त्याच दिवसापासून सुरू होण्याची शक्यता नाही. कारण विधिमंडळातील सूत्रानुसार सरकार स्थापन झाल्यानंतर विधिमंडळ सचिवालयाला अधिवेशनाच्या तयारीसाठी किमान १५ ते २० दिवस तरी लागतात. त्यामुळे ९ तारखेपासून अधिवेशन घेणे शक्य नाही. त्यामुळे ते डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. नागपुरातील काही अधिकाऱ्यांनी यासंदर्भात विधिमंडळातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनाही तिसऱ्या आठवड्यापासून अधिवेशन सुरू होणार असल्याचे सांगितले जाते. तिसऱ्या आठवड्यातील १६ डिसेंबर रोजी सोमवार येतो. त्यामुळे १६ किंवा त्यानंतरच अधिवेशनाला सुरुवात होणार असल्याची चर्चा आहे.
विधिमंडळातील अधिकारी पुढच्या आढवड्यात घेणार आढावा
मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतरच हिवाळी अधिवेशनाच्या तयारी संदर्भातील आढावा घेण्यासाठी मुंबई विधिमंडळातील अधिकारी पुढच्या आठवड्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यादृष्टीने नागपुरातील तयारीला जोर चढला आहे. विधानभवनातील इतर तयारी सुरू आहे. मंडप टाकण्यासाठी बांबू महिनाभरापासून येऊन आहेत. परंतु तारीखच जाहीर नसल्याने मंडप टाकून करणार काय? म्हणून ते तसेच होते. आता मुंबईतील अधिकाऱ्यांकडून तारखेसंदर्भात इशारा मिळाल्याने मंडप टाकण्याचे कामही सुरू करण्यात येणार आहे.
नवीन इमारतीत १२ मंत्र्यांची दालने, दुसऱ्या माळ्यावर आमदारांसाठी कॅन्टीनही
विधानभवन परिसरात कॅन्टीन तोडून नवीन इमारत बांधली जात आहे. हेरिटेज इमारतीला साजेशी इमारत बांधली जात असल्याने इमारतीला वेळ लागत आहे. अधिवेशनापर्यंत ती पूर्ण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे ती कामात येणार नाही. नवीन इमारतीच्या जागेवर पूर्वी कॅन्टीन आणि तीन मंत्र्यांची दालने होती. त्या ठिकाणी नवीन इमारतीत आता १२ मंत्र्यांची दालने व दुसºया माळ्यावर आमदारांसाठी कॅन्टीन राहणार असल्याची माहिती विधानभवनाचे पर्यवेक्षक व सहायक अभियंता संजय सतदेवे यांनी दिली. अधिवेशनाच्या दृष्टीने प्रशासकीय स्तरावर आमची तयारी सुरू आहे. आता खºया अर्थाने गती येणार आहे.
आमदार निवास-रविभवनातील आरक्षण बंद
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार निवास आणि रविभवनातील तयारीही जोरात सुरू आहे. रंगरंगोटीची कामे पूर्ण झाली आहेत. निवासस्थानातील डागडुजीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.