नागपूर हिवाळी अधिवेशन; प्रश्नोत्तरे नसल्याने लक्षवेधीवरच भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 11:17 AM2019-12-13T11:17:35+5:302019-12-13T11:19:06+5:30
येत्या १६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. यावेळी तारांकित प्रश्न राहणार नाही. त्यामुळे सदस्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न मांडण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यंदाच्या हिवाळी अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास नाही. त्यामुळे आपापल्या मतदार संघातील प्रश्न लक्षवेधीच्या माध्यमातून मांडण्यावर अधिक भर दिला जात आहे. त्यामुळे सध्या हजारो लक्षवेधी सूचना सचिवालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांशी संबंधित विविध प्रश्नांसह महिला सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित लक्षवेधी सर्वाधिक असल्याचे सांगितले जाते.
येत्या १६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशनात विविध संसदीय आयुधांच्या माध्यमातून सदस्य आपले मुद्दे मांडून न्याय मिळविण्याच्या प्रयत्नात असतात. सदस्यांसाठी तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी ही मोठी हत्यारे आहेत. परंतु यावेळी तारांकित प्रश्न राहणार नाही. त्यामुळे सदस्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न मांडण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे.
सोमवारपासून सचिवालयाचे कामकाज सुरू झाले. आतापर्यंत हजारावर लक्षवेधी दाखल झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभेत ७४४ तर विधान परिषदमध्ये ३८४ लक्षवेधी दाखल झाल्या आहेत. यातील बहुतांश लक्षवेधी महिलांवरील अत्याचार, त्यांची सुरक्षा, कायदा सुव्यवस्था, शेतकरी, शेती नुकसान, बाजारभाव या विषयावर असल्याचे सांगितले जाते. हा आकडा दीड हजाराच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
जाणकारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यातील काही नाकारण्यात येतील तर काहींचे एकत्रीकरण करण्यात येईल. त्यानंतर या लक्षवेधी सभागृहात चर्चेला येतील.
यंदा एकाच आठवड्याचे अधिवेशन निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा लक्षवेधीवर अधिक चर्चा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.