विदर्भाच्या प्रश्नावर विरोधक चूप; प्रविण दरेकर यांचा टोला
By मंगेश व्यवहारे | Published: December 20, 2023 12:58 PM2023-12-20T12:58:24+5:302023-12-20T12:58:48+5:30
राज्यात देवेंद्र आणि केंद्रात नितीन गडकरी यांच्या सारख्या नेतृत्वामुळे विदर्भातील सिंचनाचा अनुशेषही भरून निघत आहे, असेही दरेकर म्हणाले.
नागपूर :अधिवेशन विदर्भात होत असताना विदर्भातले प्रश्न, समस्या येथील विकासावर चर्चा होणे अपेक्षित होते. त्यासाठी विरोधी बाकावरच्या सदस्यांनीही आक्रमक भूमिका घेणे अपेक्षित होते. मात्र अधिवेशन संपेपर्यंत विरोधकांनी कसल्याही संसदीय आयुधांचा वापर न करता या अधिवेशनाला विदर्भापासून दूर ठेवले. विरोधक गप्प असल्याने आणि विदर्भाचा शिल्लक असलेला अनुशेष लक्षात घेता, सत्ताधारी पक्षानेच २६० अन्वये चर्चा उपस्थित केली आणि सणसणीत टोला शिंदे गटाचे आमदार प्रविण दरेकर यांनी बुधवारी येथे लगावला.
विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना दरेकर म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारपूर्वी पर्यंत राज्यात कॉँग्रेसचे सरकार होते. तेव्हा पर्यंत राज्यकर्त्यांनी विदर्भाच्या तोंडाला कायम पाने पुसली होती. मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर विदर्भाच्या विकासावर भर देत सर्वांगिण विकासाला चालना दिली. त्यांच्या कार्यकाळाताच समृद्धी सारखा महामार्ग होऊ शकल्याने विदर्भ थेट मुंबईशी जोडला गेला. त्यामुळे विदर्भात उद्योगाच्या माध्यमातून विकासाची दालने उघडी झाली. राज्यात देवेंद्र आणि केंद्रात नितीन गडकरी यांच्या सारख्या नेतृत्वामुळे विदर्भातील सिंचनाचा अनुशेषही भरून निघत आहे, असेही दरेकर म्हणाले. यावेळी प्रसाद लाडही उपस्थित होते.