पंचायत राज अभियानात नागपूर माघारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:10 AM2021-03-13T04:10:50+5:302021-03-13T04:10:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थांचे योगदान मोठे आहे. राज्यामधील विकासाच्या प्रमुख योजना पंचायत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थांचे योगदान मोठे आहे. राज्यामधील विकासाच्या प्रमुख योजना पंचायत राज संस्थांमार्फत राबविल्या जातात. पंचायत राज संस्थांना त्यांनी केलेल्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता अधिक वाढविणे व त्यांच्यामध्ये उत्कृष्ट कामांची स्पर्धा निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी राज्यात पंचायत राज संस्थांचे व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांना विभागस्तर व राज्यस्तरावर ‘यशवंत पंचायत राज अभियान’ पुरस्कार दिला जातो. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज पुरस्कारांची घोषणा केली. यात नागपूरचे पहिल्या तीनमध्येही नाव नाही.
यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेने राज्यस्तरीय उत्कृष्ट जिल्हा परिषदेचा प्रथम पुरस्कार पटकाविला असून, यवतमाळ जिल्हा परिषदेने द्वितीय आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला आहे. मात्र एकेकाळी आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या नागपूर जिल्हा परिषदेचा यात समावेश नाही. तसेच राज्यस्तरीय उत्कृष्ट पंचायत समितीमध्ये प्रथम क्रमांक कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) पंचायत समितीने पटकाविला. कागल (जि. कोल्हापूर) पंचायत समितीने द्वितीय तर भंडारा (जि. भंडारा) पंचायत समितीने तृतीय क्रमांक पटकाविला. तर ग्रामपंचायतांना स्मार्ट ग्राम व्हिलेज योजनेंतर्गत पुरस्कार देण्यात येतात. यशवंत पंचायत राज पुरस्कार निवड करण्यासाठी तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर पारितोषिक निवड समितीची स्थापना करण्यात आली होती. तसेच राज्यस्तरीय पारितोषिक निवड समितीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयांची अदलाबदल करून क्षेत्रीय पडताळणी करण्यात आली. मात्र जिल्हा परिषदेतील अनागोंदीमुळे नागपूर माघारल्याची चर्चा जिल्हा परिषदेत आहे.
बॉक्स
कामठीने राखली लाज
यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत विभागस्तरीय उत्कृष्ट पंचायत समित्यांच्या पुरस्कारांचीही घोषणा करणयत आली. त्यात नागपूर विभागात भंडारा (जि. भंडारा), पोंभुर्णा (जि. चंद्रपूर), कामठी (जि. नागपूर) या पंचायत समित्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पुरस्कार पटकाविले. विशेष म्हणजे विदर्भातील अनेक जिल्ह्यातील पंचायत समित्यांचा समावेश नसून, नागपूर जिल्ह्यात कामठीने पुरस्कार घेऊन लाज राखली.
-------------