स्मार्ट सिटी स्पर्धेत नागपूर माघारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:07 AM2021-06-26T04:07:44+5:302021-06-26T04:07:44+5:30
नागपूर : पूर्व नागपुरात स्मार्ट सिटीच्या कासवगतीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तर देशभरातील १०० शहरांच्या तुलनेत स्मार्ट सिटी स्पर्धा ...
नागपूर : पूर्व नागपुरात स्मार्ट सिटीच्या कासवगतीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तर देशभरातील १०० शहरांच्या तुलनेत स्मार्ट सिटी स्पर्धा २०२० मध्ये नागपूर माघारले आहे. कोणत्याच वर्गवारीत नागपूरला स्थान मिळाले नसून, एकेकाळी स्मार्ट सिटीच्या प्रकल्प अहवालाच्या भरवशावर नागपूर दीर्घकाळपर्यंत देशात अव्वल क्रमांकावर राहिले होते. परंतु योजनेच्या क्रियान्वयनात माघार होण्यासोबतच रँकिंगमध्येही नागपूर मागेच आहे. वर्तमानकाळात स्मार्ट सिटी रँकिंगमध्ये नागपूर ४४ व्या क्रमांकावर आहे.
केंद्रीय शहरी आवास मंत्रालयाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात सामाजिक, प्रशासकीय, सांस्कृतिक, शहर पर्यावरण, स्वच्छता, आर्थिक, पाणी, बिझनेस मॉडेल, अर्बन मोबिलिटी, कोविड इनोव्हेशन आदींबाबत अवॉर्ड देण्यात आले. स्मार्ट सिटीच्या सहा वर्षात झालेली कामे व उचललेले पाऊल पाहून हे अवॉर्ड देण्यात आले. पहिल्यांदा स्मार्ट सिटीसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. परंतु नागपूरला कोणत्याच वर्गवारीत अवॉर्ड मिळाला नाही. तर इंदूर आणि सुरत संयुक्तरीत्या अव्वल क्रमांकावर राहून त्यांना ओव्हरऑल परफॉर्मन्स अवॉर्ड २०२० मिळाला. राज्याच्या वर्गवारीत उत्तर प्रदेश अव्वल क्रमांकावर राहिले. महाराष्ट्रातून एकमेव कल्याण-डोंबिवली महापालिका कोविड इनोव्हेशनमध्ये अवॉर्ड मिळविण्यात यशस्वी ठरली. नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन लिमिटेड(एनएसएससीडीसीएल)च्या वतीने पूर्व नागपूरच्या पारडी, पुनापूर, भरतवाडा, भांडेवाडीच्या १७३० एकरमध्ये स्मार्ट सिटी प्रोजेक्ट अमलात आणण्यात येत आहेत. ६५० कोटी रुपयांचे टेंडरश्योर, २२० कोटी रुपयांचे होम स्वीट होम प्रोजेक्टवर काम प्रस्तावित आहे. होम स्वीट होम प्रोजेक्टचे काम अद्यापपर्यंत सुरू होऊ शकले नाही. त्याचप्रमाणे ५२ किलोमीटरचे रस्ते तयार करण्यात येणार होते. तीन वर्षात यापैकी २५ टक्के रस्त्यांचे कामही सुरू होऊ शकले नाही. या सर्व कारणांमुळे स्मार्ट सिटी रँकिंगमध्ये नागपूर ४४ व्या क्रमांकावर पोहोचले आहे.
...............