नागपूर महिला बँकेत उफराटा प्रकार; चोरांच्या हातात बँकेच्या किल्ल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 10:25 AM2017-12-21T10:25:58+5:302017-12-21T10:28:16+5:30
नागपूर महिला बँकेत एकरकमी कर्ज भरणाऱ्या (ओटीसी) घोटाळ्यातील आरोपी जिल्हा उपनिबंधक जे.के. ठाकूर अणि सहायक उपनिबंधक पंकज वानखेडे यांच्यावर सहकार खाते मेहरबान असून, सहकार आयुक्तांच्या कृपेने त्यांची इतर बँकांमध्ये अवसायक म्हणून नियुक्ती झाली आहे.
मोरेश्वर मानापुरे ।
आॅनलाईन लोकमत
नागपूर : नागपूर महिला बँकेत एकरकमी कर्ज भरणाऱ्या (ओटीसी) घोटाळ्यातील आरोपी जिल्हा उपनिबंधक जे.के. ठाकूर अणि सहायक उपनिबंधक पंकज वानखेडे यांच्यावर सहकार खाते मेहरबान असून, सहकार आयुक्तांच्या कृपेने त्यांची इतर बँकांमध्ये अवसायक म्हणून नियुक्ती झाली आहे. घोटाळा करणारे दोन्ही आरोपी मोकळे असून चोरांच्या हातात बँकेच्या किल्ली, अशी स्थिती आहे.
सहकार मंत्र्यांच्या आदेशाकडे कानाडोळा
सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी १५ आॅक्टोबर १०१७ रोजी दोन्ही घोटाळेबाज अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देऊनसुद्धा जिल्हा उपनिबंधक नागपूर यांनी कोणतीही कारवाई केली नाही, किंबहुना पुन्हा घोटाळा करण्यास वाव दिल्याचे समितीचे मत आहे.
बँकेच्या चौकशीत येणार अडथळा
पंकज वानखेडे यांच्या नियुक्तीमुळे समता बँकेच्या सीआयडीद्वारे सुरू असलेली एमपीआयडी कायद्याची कारवाई तसेच ईडीच्या केसेसमध्ये अडथळा निर्माण होणार आहे. कारण चुकीच्या अधिकाऱ्याकडे चार्ज दिल्यामुळे त्यांना दोन ते तीन वर्षे केसेसची माहिती व्हायला लागतील व कर्जवसुली होणार नाही. ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळण्याची आशाच संपून जाईन. पूर्वीचे अवसायक चैतन्य नासरे यांनी कर्जवसुलीला वेग आणला होता. सध्या हिंगणा येथे कार्यरत असलेले नासरे यांच्याकडे पुन्हा अवसायकाची जबाबदारी द्यावी, अशी समितीची मागणी आहे. ठाकूर आणि वानखेडे यांच्या कार्यकाळात अवसायनातील नागपूर महिला बँकेला ओटीएस घोटाळ्यात १.२५ कोटींचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग-१ श्रीकांत सुपे यांनी शासनाकडे सादर केला होता. त्यांच्यावर जिल्हा उपनिबंधकांनी फौजदारी कारवाई न करता कलम ८० ची कारवाई सुरू केली. ती सध्या थंडबस्त्यात आहे. नागपूर शहर-३ चे उपनिबंधक जगताप चौकशी करीत आहेत. नवीन कायद्यांतर्गत दोन वर्षांत चौकशी पूर्ण होणे बंधनकारक आहे. ही चौकशी सहा टप्प्यात होणार आहे. वर्षभरात दोनच दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. ही कारवाई म्हणजे गंभीर प्रकणातील दोन्ही आरोपींना सहकारी खात्याने एकप्रकारे ‘गिफ्ट’ दिले आहे.