नागपुरात तरुणीचे अपहरण करून मध्यप्रदेशात केली विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 02:44 PM2019-02-18T14:44:19+5:302019-02-18T14:45:47+5:30
गुंगीच्या पदार्थाचा रुमाल नाकाला लावून बेशुद्ध केल्यानंतर चौघांनी नागपूरमधील एका तरुणीला मध्यप्रदेशात नेले. तेथे एका व्यक्तीला तिची ७५ हजार रुपयात विक्री करून आरोपींनी तिचे त्याच्यासोबत लग्न लावून दिले. या घटनेचा तब्बल सात महिन्यांनंतर उलगडा झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुंगीच्या पदार्थाचा रुमाल नाकाला लावून बेशुद्ध केल्यानंतर चौघांनी गिट्टीखदानमधील एका तरुणीला मध्यप्रदेशात नेले. तेथे एका व्यक्तीला तिची ७५ हजार रुपयात विक्री करून आरोपींनी तिचे त्याच्यासोबत लग्न लावून दिले. जुलै २०१८ मध्ये घडलेल्या या घटनेचा तब्बल सात महिन्यांनंतर उलगडा झाला. या प्रकरणी पोलिसांनी तीन महिलांसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
२२ वर्षीय तरुणीने नोंदविलेल्या तक्रारीनुसार, आरोपी आशा रोकडे, उषा रोकडे, चंदा गजभिये आणि त्यांचा एका साथीदार हे सर्व गिट्टीखदानमधील जगदीशनगरात तरुणीच्या शेजारी राहतात. त्यामुळे तरुणीसोबत त्यांची बोलचाल होती. तरुणीचे पालक तिच्या लग्नासाठी वर शोधत होते. ते माहित असल्यामुळे तरुणीसोबत आशा, उषा आणि चंदाने सलगी वाढवली. तिला चांगला वर शोधून देतो, असे सांगून १४ जुलै २०१८ ला दुपारी १२ च्या सुमारास आपल्या घरी बोलविले. तेथे बोलता बोलता आरोपीने तिच्या नाकावर रुमाल ठेवला. ती बेशुद्ध झाल्यानंतर आरोपींनी तिला तशाच अवस्थेत मध्यप्रदेशातील शहजानपूर येथे नेले. तेथील अशोक कैलास सिसोदिया याला ७५ हजार रुपयात तरुणीला विकले. त्यानंतर सिसोदियासोबत तिचे लग्न लावून दिले. यावेळी आरोपी महिलांनी सिसोदियाला आपली ओळख तरुणीची आई तसेच मावशीच्या रुपात दिली.
दरम्यान, तरुणीचा संसार सुरळीत सुरू झाला. आता सात महिन्यानंतर तरुणी आणि तिचा पती सिसोदिया कौटुंबिक गप्पा करीत असताना त्यांच्यात लग्नापूर्वीच्या गोष्टी निघाल्या. यावेळी सिसोदियाने तुझी मला विक्री करताना तुझ्या आई आणि मावशीने ७५ हजार रुपये माझ्याकडून घेतल्याचे तरुणीला सांगितले. तेव्हा या प्रकरणाचा उलगडा झाला. आशा, उषा आणि चंदा पैकी कुणीच नातेवाईक नसल्याचे तरुणीने सांगितले. त्यानंतर सिसोदिया आणि त्याची पत्नी (तक्रारदार तरुणी) शहजानपूरच्या पोलीस ठाण्यात तेले. त्यांनी सर्व माहिती तेथील पोलिसांना दिली. शहजानपूर पोलिसांनी गिट्टीखदान पोलिसांना कळविले. त्यानंतर सिसोदिया दाम्पत्य शुक्रवारी नागपुरात पोहचले. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी आशा, उषा, चंदा आणि त्यांच्या एका साथीदाराविरुद्ध अपहरण करून तरुणीची विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
त्यांचा तोच धंदा ?
आरोपी महिला सध्या परप्रांतात गेल्या आहेत. त्यांनी पुन्हा कुण्या दुस-या तरुणीला अशाच प्रकारे तिकडे नेले असावे, असा संशय आहे. एका विशिष्ट समाजातील रितीरिवाजाप्रमाणे लग्नाच्या बदल्यात वधूच्या माहेरच्यांना वर पक्षाकडून रोख स्वरूपात रक्कम दिली जाते. आरोपी महिला आणि त्यांचे साथीदार गरजू तरुणींना भूलथाप देऊन बाहेर प्रांतात नेत असावे आणि त्यांची तिकडे विक्री करीत असावेत, असा संशय आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.