नागपुरातील यशोधरानगर, कोराडीत क्रिकेट सट्टा : दोन बुकी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:20 AM2019-06-18T00:20:12+5:302019-06-18T00:22:01+5:30
परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या विशेष पथकाने यशोधरानगर आणि कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापे मारून दोन बुकींना अटक केली. रविवारी आणि सोमवारी असे दोन दिवस पोलिसांनी ही कामगिरी बजावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या विशेष पथकाने यशोधरानगर आणि कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापे मारून दोन बुकींना अटक केली. रविवारी आणि सोमवारी असे दोन दिवस पोलिसांनी ही कामगिरी बजावली.
भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या क्रिकेट सामन्यावर यशोधरानगरातील पाहुणे ले-आऊटमध्ये राहणारा बुकी विकास वंजारी (वय ४०) क्रिकेट सट्ट्याची खायवाडी करीत होता. रविवारी सायंकाळी वंजारीला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याकडून टीव्ही, मोबाईलसह २२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
त्याचप्रमाणे कोराडीतील स्मृतीनगरात अल्तमश मुर्शिद खान (वय २९) हा सोमवारी वेस्ट इंडिज आणि बांगलादेश संघादरम्यान सट्ट्याची खायवाडी करताना मिळाला. पोलिसांनी त्याच्याकडून रोख आणि साहित्यासह ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
परिमंडळ पाचचे उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व्ही. एम. धोंगडे तसेच पथकातील कर्मचारी सतीश मोहाडे, मनीष भोसले, अनंता गारमोडे, दुर्गेश माकडे, नीतेश धाबर्डे आणि मनीष बुरडे यांनी ही कामगिरी बजावली.
लोकमतच्या वृत्तावर शिक्कामोर्तब
विशेष म्हणजे, लोकमतने रविवारी भारत-पाकिस्तान दरम्यानच्या क्रिकेट सामन्यावर पाच हजार कोटींचा सट्टा खेळला गेल्याची आणि नागपुरात मोठ्या प्रमाणात बुकी असल्याची माहिती ठळकपणे प्रकाशित केली होती. या कारवाईतून त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.