Nagpur: नागपुरात सॉफ्टवेअर अभियंता तरुणीला जुन्या प्रियकराकडून ॲसिड हल्ल्याची धमकी

By योगेश पांडे | Published: July 22, 2024 10:10 PM2024-07-22T22:10:01+5:302024-07-22T22:10:22+5:30

Nagpur:

Nagpur: Young software engineer threatened with acid attack by old boyfriend in Nagpur | Nagpur: नागपुरात सॉफ्टवेअर अभियंता तरुणीला जुन्या प्रियकराकडून ॲसिड हल्ल्याची धमकी

Nagpur: नागपुरात सॉफ्टवेअर अभियंता तरुणीला जुन्या प्रियकराकडून ॲसिड हल्ल्याची धमकी

- योगेश पांडे 
नागपूर  - उपराजधानीत महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून एका सॉफ्टवेअर अभियंता तरुणीला जुन्या प्रियकराकडून ॲसिड हल्ल्याची धमकी देण्यात आली. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून त्यामुळे खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात समतानगर, भूमी ले आऊट येथीलप्रतिक लक्ष्मण नगफासे, रितेश देशमुख व शुभम सावरकर हे आरोपी आहेत. तक्रार करणारी तरुणी एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत आहे. तिचे प्रतिकसोबत प्रेमसंबंध होते व ते काही काळ लिव्ह इन रिलेशनशीपमध्येदेखील होते. त्याने तिच्यावर अत्याचारदेखील केला होता. तिने त्याच्याशी लग्न करण्याची मागणी घातली होती. मात्र त्याने व त्याच्या कुटुंबियांनी नकार दिला होता. त्यामुळे तिने त्याच्याविरोधात जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी एप्रिल महिन्यात त्याच्याविरोधात कलम ३७६ (२) व पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्यांच्यात कुठल्याही प्रकारचा संपर्क नव्हता.

२१ जुलै रोजी ती सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास किराणा दुकानाकडे जात होती. कबीरनगर ते उप्पलवाडी पोस्ट ऑफिस या मार्गावर प्रतिक, रितेश व शुभम यांनी तिचा पाठलाग केला. तिघांनीही तिला शिवीगाळ केली. तू माझ्यासोबत चांगले केलेले नाही. मी चांगल्या कामासाठी बाहेर जात आहे. त्यामुळे तू वाचली. परत आल्यावर तुझ्या तोंडावर ॲसिड फेकून तुझे आयुष्यच खराब करतो या शब्दांत तिला प्रतिकने धमकी दिली. या प्रकारामुळे संबंधित तरुणी घाबरली व दुचाकी वळवून थेट घराकडे गेली. तिने घरच्यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर ते सर्व तक्रार देण्यासाठी कपिलनगर पोलीस ठाण्यात पोहोचले. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी तीनही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७८, ३५१(३) व ३(५)अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Nagpur: Young software engineer threatened with acid attack by old boyfriend in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.