नागपुरात मानसिक स्वास्थ्य बिघडल्यामुळे तलावात उडी मारून तरुणीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 05:36 PM2020-10-29T17:36:14+5:302020-10-29T17:36:35+5:30
suicide Nagpur News दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या आणि मानसिक अवस्था ठीक नसलेल्या एका तरुणीने गांधीसागर तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. बुधवारी मध्यरात्री ही घटना उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या आणि मानसिक अवस्था ठीक नसलेल्या एका तरुणीने गांधीसागर तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. बुधवारी मध्यरात्री ही घटना उघडकीस आली.
भाग्यश्री ऊर्फ पल्लवी सुनीलराव देशमुख (वय २९) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती गणेशपेठमध्ये राहत होती. बुधवारी रात्री ११ च्या सुमारास ती घरून निघून गेली. त्यामुळे पालकांनी तिची शोधाशोध सुरू केली. ती यापूर्वीही अशाच प्रकारे घरून निघून गेली होती. तिचा मृतदेह गांधीसागर तलावात तरंगत असल्याचे पालकांना कळाले. त्यामुळे पालकांनी तिकडे धाव घेतली. समाजसेवक दाम्पत्य जयश्री आणि जगदीश खरे यांनी तेवढ्या रात्री पल्लवीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. माहिती कळताच गणेशपेठ पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पल्लवीचा मृतदेह मेडिकलला पाठविला. गुरुवारी सकाळी पल्लवीचे कुटुंबीय पोलीस ठाण्यात पोहोचले.
त्यांच्या माहितीनुसार पल्लवीला मानसिक आजार होता. तिच्यावर उपचारही सुरू होते. ती मानसिक अवस्था बिघडल्यानंतर कधीही घरून निघून जात होती. गुरुवारी रात्री अकरा वाजता घरच्यांचे लक्ष नसल्याचे पाहून ती घरून निघून गेली. तिने गांधीसागर तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे, पल्लवीचे दोन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. गुजरातमध्ये तिचे सासर होते. लग्न झाल्याच्या काही दिवसानंतर पल्लवी आणि तिच्या सासरच्या मंडळींनी माहेरच्यांना फोन करून बोलवून घेतले आणि पल्लवीला माहेरी परत पाठवले. तेव्हापासून ती नागपुरातच राहत होती, अशी माहिती पल्लवीच्या पालकांनी पोलिसांना दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक अरविंद कोल्हारे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.