नागपुरात कुख्यात गुंडाकडून तरुणीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 09:04 PM2020-06-08T21:04:19+5:302020-06-08T21:07:10+5:30
दुचाकीवरून जात असलेल्या तरुणीचे केस धरून तिला खाली ओढून मारहाण करणाऱ्या गुन्हेगाराने नंतर तिच्या भावावर प्राणघातक हल्ला चढवला. अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ट्रस्ट ले-आऊटमध्ये रविवारी रात्री ही घटना घडली. यामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुचाकीवरून जात असलेल्या तरुणीचे केस धरून तिला खाली ओढून मारहाण करणाऱ्या गुन्हेगाराने नंतर तिच्या भावावर प्राणघातक हल्ला चढवला. अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ट्रस्ट ले-आऊटमध्ये रविवारी रात्री ही घटना घडली. यामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
तरुणीने नोंदविलेल्या तक्रारीनुसार, रविवारी रात्री ७.३० च्या सुमारास दुचाकीने आपल्या घरी जात असताना तिच्या घराजवळ राहणारा सतीश ताराचंद चन्ने (वय ३०) हा कुख्यात गुंड अचानक दुचाकीसमोर आला. दुचाकी वेगात असल्यामुळे त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात तरुणीने त्याला कट मारला. त्यामुळे संतापलेल्या आरोपी सतीश चन्ने याने तिचे केस ओढले आणि अश्लील शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर तिला मारहाण करून तिचा विनयभंगही केला. तरुणीने घरी जाऊन आपल्या भावाला ही बाब सांगितली. तरुणीचा भाऊ आरोपी सतीशला जाब विचारायला आला असता आरोपी सतीशने तरुणीच्या भावालाही मारहाण केली. आरोपीचा साथीदार देवानंद श्रावण शिरसाठ आणि अन्य एकाने तरुणीच्या भावाला खाली पडून त्याला दगडाने ठेचण्याचा प्रयत्न केला. तरुणीने भावाची मदत करून कसेबसे त्याला आरोपींच्या तावडीतून सोडविले. दरम्यान, प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीच्या भावाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे ट्रस्ट ले-आऊट परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी आरोपी सतीश तसेच देवानंद शिरसाठ या दोघांना अटक केली. पुढील तपास सुरू आहे.
आरोपीवर शंभराहून अधिक गुन्हे दाखल
आरोपी सतीश चन्ने हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर लहान-मोठे तब्बल १०५ गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. तो नुकताच कारागृहातून बाहेर आला असून त्याने पुन्हा गुन्हेगारी सुरू केली आहे.