चीनच्या प्रवासातून आलेला नागपूरचा युवक आजारी, कोरोना ची होणार तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 09:32 PM2020-01-29T21:32:21+5:302020-01-29T21:34:34+5:30
व्यवसायासाठी ११ दिवस चीनमध्ये राहून भारतात परतलेला नागपूरचा एक युवक अचानक आजारी पडला. सर्दी, खोकला, ताप कमी होत नसल्याने युवक शहरातील मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचारासाठी आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : व्यवसायासाठी ११ दिवस चीनमध्ये राहून भारतात परतलेला नागपूरचा एक युवक अचानक आजारी पडला. सर्दी, खोकला, ताप कमी होत नसल्याने युवक शहरातील मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचारासाठी आला. बुधवारी उपचारासंदर्भातील आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. गुरुवारी त्याची कोरोना व्हायरसशी संबंधित तपासणी होणार असल्याची माहिती आहे. तपासणीचा रिपोर्ट येईपर्यंत त्या युवकाला खबरदारी म्हणून मेडिकलमध्येच भरती ठेवण्यात येऊ शकते, अशीही माहिती आहे.
नागपूर येथे रहिवासी असलेल्या ३२ वर्षीय युवकाचा कार एक्सेसरीजचा व्यवसाय आहे. तो चीन येथून एक्सेसरीज मागवित होता. २६ डिसेंबर २०१९ ते ६ जानेवारी २०२० दरम्यान तो व्यवसायानिमित्त चीनमध्ये थांबला होता. तो भारतात आल्यानंतर त्याला ताप, सर्दी, खोकला झाला. चीनमधून परतल्यामुळे कोरोना व्हायरसची लागण झाली तर नाही, अशी भीती त्याला वाटायला लागली. त्यामुळे युवकाने मेडिकलमध्ये संपर्क साधला. बुधवारी मेडिकलमध्ये आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण केली. आता युवकाची कोरोना व्हायरस शी संबंधित तपासणी गुरुवारी होणार असल्याची माहिती आहे. मेडिकलच्या अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली आहे.
प्रसार होणार नाही हा उद्देश
पीडित युवकाचे लग्न झाले आहे. लोकमतशी बोलताना तो म्हणाला की, त्याला दोन मुली आहे. मुले लहान असल्यामुळे चिंता वाटत होती. चीनमधून आल्यामुळे माझ्या आजाराचा कोरोना व्हायरसशी काही संबंध असेल तर पुढे गंभीर होईल. त्यामुळे लगेच तपासणी करून घेण्याचा निर्णय घेतला. असे काही असले तर वेळीच खबरदारी घेतल्यामुळे प्रसार होणार नाही.
काही गोष्टीची खबरदारी घेणे गरजेचे
अद्यापही नागपुरात कोरोना व्हायरसची पुष्टी झालेली नाही. तरीही आवश्यक काही खबरदारी घेऊन त्यापासून दूर राहता येऊ शकते. शक्यतो आपले हात साबणाने स्वच्छ धुवावे. खोकलताना अथवा शिंकताना नाक व तोंडावर टिश्यू अथवा रुमालाने झाकावे. ज्यांना सर्दी अथवा तापचे लक्षण असेल त्यांच्या फार जवळ जाणे टाळावे. गर्दीच्या जागी जाऊ नये. विशेष म्हणजे चीनहून परतलेल्या व्यक्तीपासून दूर रहावे. भाजी व फळांना खाण्यापूर्वी पाण्याने स्वच्छ धुवावे. ज्या देशात या व्हायरसचा प्रकोप पसरला असेल तिथे प्रवास करणे टाळावे. सार्वजनिक स्थळांवर अथवा सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा वापर शक्यतो टाळल्यास व्हायरसची लागण होणार नाही.