कर्ज घेऊन परदेशात गेला अन अमेरिकन एजन्सीजच्या हाती लागला; एजंट्सने दिला धोका
By योगेश पांडे | Updated: February 6, 2025 20:10 IST2025-02-06T20:10:17+5:302025-02-06T20:10:55+5:30
अमेरिकेतून डिपोर्ट करण्यात आलेल्या नागपुरकर तरुणाची आपबिती

कर्ज घेऊन परदेशात गेला अन अमेरिकन एजन्सीजच्या हाती लागला; एजंट्सने दिला धोका
नागपूर : अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या १०४ भारतीयांना बुधवारी डिपोर्ट करण्यात आले व त्यांना घेऊन अमेरिकन लष्करी विमान अमृतसरमध्ये उतरले. यावरून राजकारण तापले असताना या १०४ जणांमध्ये एक नागपुरकरदेखील असल्याची बाब समोर आली आहे. संबंधित तरुण बॅंकेतून कर्ज घेऊन व नातेवाईकांकडून पैसे उधार घेऊन निघाला होता. आयुष्यात सेटल होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणाला अनेक संघर्षांचा सामना करावा लागला, मात्र अमेरिकेत स्वत:ला घडविण्यात यश न आल्याची सल त्याच्या चेहऱ्यावरूनच दिसून येत होती.
हरप्रीतसिंग लालिया असे संबंधित तरुणाचे नाव असून तो गुरुवारी नागपुरात परतला. ५ डिसेंबर २०२४ रोजी तो नागपुरातून निघाला. त्याच्याजवळ पासपोर्ट होता व कॅनडाच्या व्हिसावर प्रवास करायचा होता. त्याची कनेक्टिंग फ्लाईट ६ डिसेंबर रोजी अबू धाबीहून होती. मात्र त्याला त्या विमानात चढूच देण्यात आले नाही व त्याला दिल्लीला परतावे लागले. दिल्लीत आठ दिवस राहिल्यानंतर तो इजिप्तमधील कैरोकडे विमानाने निघाला. त्यानंतर त्याला इजिप्तहून स्पेनमार्गे कॅनडातील मॉन्ट्रियालला पाठविण्यात येणार होते. प्रत्यक्षात स्पेनमध्ये उतरल्यानंतर त्याचे सामानच तिथे पाठविण्यात आले. स्पेनमध्ये ४ दिवस राहिल्यानंतर त्याला ग्वाटेमालाला पाठवण्यात आले, त्यानंतर तेथून निकाराग्वा, होंडुरास, मेक्सिको मार्गे तो टैकेटन सीमेवर पोहोचलो. या प्रवासादरम्यान त्याने ४९ लाख ५० हजार रुपये खर्च केले. त्यासाठी त्याने बॅंकेचे कर्जदेखील घेतले होते.
एजंटच्या निष्काळजीपणामुळे कॅनडाऐवजी पोहोचला अमेरिकेत
हरप्रीतसिंग अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले होते. आम्हाला सांगण्यात आले की आम्हाला सोडण्यात आले आहे आणि मात्र आमच्या हातापायात बेड्या होत्या. मी कॅनेडियन व्हिसावर गेलो होतो आणि कॅनडामध्ये काम करण्यास उत्सुक होतो. पण एजंटच्या निष्काळजीपणामुळे मला या मार्गाने जावे लागले, असे त्याने सांगितले.
मेक्सिकोतील माफियांशी झाला सामना
हरप्रीतसिंगला मेक्सिकोतील आर्मिसेल्लो येथे माफियांनी पकडले होते. काही दिवस त्याला तेथे घालवावे लागले. मेक्सिकोतील ताकैत पर्वतरागांमध्ये चार तास चढावे लागले व त्यानंतर १६ तास अमेरिकेच्या बाजुला चालावे लागले. ते क्षण केवळ भितीने भरलेले होते. केवळ आयुष्यातील स्वप्ने पूर्ण होतील या अपेक्षेत मी सर्व काही सहन केले. मात्र आता सर्व काही संपले आहे अशी भावना त्याने व्यक्त केली.