नागपुरात वाघाच्या नखासह युवकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 12:14 AM2018-10-04T00:14:15+5:302018-10-04T00:15:57+5:30
जरीपटका पोलिसांनी बुधवारी रात्री केलेल्या कारवाईत एका युवकाला वाघाच्या नखासोबत पकडले. प्राथमिक तपासात हा युवक वन्यजीवांच्या अवयवाची तस्करी करीत असल्याचा संशय आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जरीपटका पोलिसांनी बुधवारी रात्री केलेल्या कारवाईत एका युवकाला वाघाच्या नखासोबत पकडले. प्राथमिक तपासात हा युवक वन्यजीवांच्या अवयवाची तस्करी करीत असल्याचा संशय आहे.
मंगेश ऊर्फ मोनू दिलीप बोबिले (२७) रा. नागार्जुन कॉलनी, जरीपटका असे आरोपी युवकाचे नाव आहे. सूत्रानुसार मोनू डेकोरेशनचे काम करतो. जरीपटका पोलिसांना मोनू वन्यजीवांच्या अंगांची तस्करी करीत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी याबाबत आणखी गुप्तपणे माहिती मिळविली. पोलिसांनी एका डमी ग्राहकाच्या माध्यमातून मोनूसोबत संपर्क साधला. मोनूने वाघाच्या नखाचा सौदा केला. त्याने वाघाच्या नखाच्या मोबदल्यात २५ हजार रुपये मागितले. बुधवारी सायंकाळी ग्राहकाला जरीपटका येथील दयानंद पार्कजवळ बोलावले. पोलीस निरीक्षक पराग पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पार्कजवळ जाळे पसरविले. तिथे मोनू येताच त्याला पकडले. ठाण्यात आणून त्याची विचारपूस केली केली. त्याच्याजवळ वाघाचे नख सापडले. पोलिसांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. यानंतर वन विभागातील एक चमू रात्री ठाण्यात आली. त्यांनी मोनूला ताब्यात घेऊन वाघाचे नख जप्त केले.
सूत्रानुसार जप्त करण्यात आलेल्या वाघाच्या नखाची किंमत एक लाखापेक्षाही अधिक असल्याचे सांगितले जाते. मोनूने सांगितल्यानुसार त्याने ते नख ओमकार नावाच्या युवकाकडून खरेदी केले होेते. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. या कारवाईमुळे वन विभाग हादरले आहे.