नागपूर जिल्हा परिषद : पदाधिकाऱ्यांच्या नावाचे फलकही झाकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 11:21 PM2019-03-27T23:21:32+5:302019-03-27T23:23:31+5:30
जिल्हा परिषदेने आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये म्हणून चांगलेच मनावर घेतले आहे. यापूर्वी आचारसंहिता लागूनही जि.प. चे फलक झाकले जात नव्हते. यावर्षी मात्र जि.प.ने पदाधिकाऱ्यांच्या नावांचे सर्वच फलक कागदाने झाकून ठेवत आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेने आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये म्हणून चांगलेच मनावर घेतले आहे. यापूर्वी आचारसंहिता लागूनही जि.प. चे फलक झाकले जात नव्हते. यावर्षी मात्र जि.प.ने पदाधिकाऱ्यांच्या नावांचे सर्वच फलक कागदाने झाकून ठेवत आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्याचे दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होताच आचारसंहिता लागली. यावर्षीच्या निवडणुकीत पहिल्यांदाच आचारसंहितेची प्रशासनाकडून काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे चित्र आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रशासनाने
पदाधिकाऱ्यांची वाहने सरकारजमा केली. किंबहुना पदाधिकाऱ्यांनीच शासकीय वाहने प्रशासनाकडे आचारसंहितेनंतर जमा केली. यापूवीर्ही लोकसभा, विधानसभा, जि.प. निवडणुकीची आचारसंहिता लागली तेव्हा जिल्हा परिषदेमधील पदाधिकाऱ्यांच्या नावाचे फलक पेपरने झाकले नव्हते. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जि.प. ने चांगलीच मनावर घेतल्याचे दिसून येत आहे. आचारसंहिता लागताच प्रशासनाने जि.प.मधील पदाधिकाऱ्यांच्या नावांचे अनेक फलक कागदाने चिकटवून, झाकून ठेवले आहे. कागदाने झाकलेली फलके पाहून ‘जि.प.मध्ये यापूर्वी एवढी काटेकोरपणे आचारसंहिता पाहिली नाही’ असे आश्चर्यकारक उद्गार पदाधिकाऱ्यांसह अनेकांच्या तोंडातून निघत आहे. आचारसंहितेच्या कालावधीत कुठल्याही प्रकारच्या विकास कामांना मान्यता देणे अथवा त्याचे उद्घाटन करणे याला मनाई असल्याने पदाधिकाऱ्यांनी जि.प.कडे पाठ फिरविली आहे. जि.प.चे पदाधिकारी विविध भागात राहतात. लांब अंतरावरून खासगी वाहनावर खर्च करणे त्यांना पेलणारा नाही. त्यामुळे जि.प.मध्ये येणे ते टाळत आहेत. आचारसंहिता संपेपर्यंत विकास कामांच्या उद्घाटनाला ब्रेक लागल्याने जि.प.तील प्रमुख अधिकारी निवडणुकीच्या कामासाठी गुंतले आहेत, तर पदाधिकारी व सदस्यांनी जि.प.कडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.