नागपूर जिल्हा परिषद : विषय समितीच्या सदस्यत्वासाठी रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 09:24 PM2020-02-15T21:24:48+5:302020-02-15T21:28:16+5:30
जिल्हा परिषदेच्या विषय समितीकरिता सभापतींसोबत सदस्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अनेक सदस्यांना स्थायी व वित्त समिती हवी आहे तर काहींनी शिक्षणला पसंती दिल्याचे समजते. सोमवारी दोन सभापतींना समितीचे वाटप होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेच्या विषय समितीकरिता सभापतींसोबत सदस्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अनेक सदस्यांना स्थायी व वित्त समिती हवी आहे तर काहींनी शिक्षणला पसंती दिल्याचे समजते. सोमवारी दोन सभापतींना समितीचे वाटप होणार आहे.
जिल्हा परिषदेत उपाध्यक्षसह पाच सभापतिपद आहेत. महिला व बाल कल्याण व समाजकल्याण समितीसाठी प्रत्येकी एक सभापती आहे. कृषीला पशुसंवर्धनाची जोड आहे. एका सभापतीला ही दोन्ही पदे सांभाळावी लागतात. आरोग्य, बांधकाम, अर्थ व शिक्षण या समित्यांचा प्रभार निश्चित करावा लागणार आहे. उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी आरोग्य आणि बांधकाम समिती ठेवणार असल्याचे संकेत दिले आहे. अर्थ व शिक्षण समिती एका सभापतीकडे असणार आहे. ही महत्त्वाची समिती असल्याने निवडून आलेले दोन्ही सभापती त्यासाठी इच्छुक आहे. या दोन्ही विषय समित्या कुणाला द्यायच्या याबाबत रविवारला क्रीडा व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार व उपाध्यक्ष मनोहर कुंभारे तसेच जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, नाना गावंडे यांच्यात चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येते. सभापतींना विषय समित्यांच्या वाटपासोबत सदस्यांची नियुक्ती सुद्धा होणार आहे. पक्षाच्या संख्याबळावर सदस्यांची वर्णी लागणार आहे. अनेक सदस्यांनी स्थायी व वित्त समितीला पसंती दिली आहे तर काहींना शिक्षण व बांधकाम समितीमध्ये जायचे आहे. जवळपास सर्वच सदस्यानांची वर्णी कोणत्या ना कोणत्या समितीवर लागणार आहे.