ऑनलाईन सर्व्हिस बुक करण्यात नागपूर जिल्हा परिषद राज्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 08:22 PM2019-07-09T20:22:47+5:302019-07-09T20:25:03+5:30

शासकीय कर्मचाऱ्यांचे सर्व्हिस बुक ऑनलाईन करण्यात येत आहे. याची सुरुवात नागपूर जिल्हा परिषदेने केली होती. आतापर्यंत पडताळणीची ९९ टक्के प्रक्रिया पूर्ण झाली असून, संपूर्ण कर्मचाऱ्यांचे सर्व्हिस बुक आता ऑनलाईन झाले आहे.

Nagpur Zilla Parishad first in the state for online service book | ऑनलाईन सर्व्हिस बुक करण्यात नागपूर जिल्हा परिषद राज्यात प्रथम

ऑनलाईन सर्व्हिस बुक करण्यात नागपूर जिल्हा परिषद राज्यात प्रथम

Next
ठळक मुद्देनागपुरातूनच झाली होती सुरुवात : ९९ टक्के पडताळणी पूर्ण

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : शासकीय कर्मचाऱ्यांचे सर्व्हिस बुक ऑनलाईन करण्यात येत आहे. याची सुरुवात नागपूर जिल्हा परिषदेने केली होती. आतापर्यंत पडताळणीची ९९ टक्के प्रक्रिया पूर्ण झाली असून, संपूर्ण कर्मचाऱ्यांचे सर्व्हिस बुक आता ऑनलाईन झाले आहे.
सरकारी कर्मचारी म्हणून रुजू झाल्यापासून निवृत्तीपर्यंतची सगळी माहिती देणारी गोष्ट म्हणजे ‘सर्व्हिस बुक’ आहे. अनेकवर्षे त्यात नोंदी होत राहतात आणि अनेकदा सर्व्हिस बुकची परिस्थिती जुन्या पोथ्यांसारखी होते. केंद्र व राज्य सरकारने ई-गव्हर्नन्सवर भर देण्यासाठी अनेक प्रणाली ऑनलाईन केल्या आहेत. यात निविदा प्रक्रियेपासून सेवार्थ प्रणालीपर्यंत सगळ्या प्रणाली ऑनलाईन केल्या जात आहेत. आता ‘सर्व्हिस बुक’सुद्धा ऑनलाईन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नागपूर जिल्हा परिषदेने सर्वप्रथम हे काम हाती घेतले. या प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांच्या सेवेचा रेकॉर्ड एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. हा प्रकल्प आता राज्यभर राबविला जात आहे. सर्वच जिल्हा परिषदांमधील कर्मचाऱ्यांचे सर्व्हिस बुक आता ऑनलाईन होत आहे. यासाठी सर्वच कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाईन भरली जात आहे. नागपूर जिल्हा परिषदेत एकूण ७९९१ कर्मचारी आहेत. यातील ७९४१ कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन सर्व्हिस बुक सुरू झाले आहे. यातील ७९१६ कर्मचाऱ्यांचे ‘सर्व्हिस बुक’ची पडताळणीसुद्धा झालेली आहे. नागपूर जिल्हा परिषदेतील ९९.०६ टक्के पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पडताळणी प्रक्रियेत नागपूर प्रथम क्रमांकावर आहे. ७ कर्मचाऱ्यांच्या ‘सर्व्हिस बुक’ची पडताळणी शिल्लक असून ६८ कर्मचाऱ्यांची माहिती अद्याप ऑनलाईन झालेली नाही. नागपूर खालोखाल नाशिक जिल्हा परिषदेत पडताळणीची टक्केवारी ९८.६२ टक्के इतकी आहे. नाशिक जिल्हा परिषदेत एकूण १६८८६ कर्मचारी असून त्यातील १६८८१ कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन सर्व्हिस बुक सुरू झाले आहे. मात्र पडताळणी प्रक्रियेत नाशिक नागपूरपेक्षा किंचित मागे आहे. त्या खालोखाल जळगाव आणि अहमदनगर या जिल्हा परिषदेचा क्रमांक आहे. राज्यात पालघर जिल्हा परिषदेतील हे काम फारच संथगतीने सुरू आहे. तेथील पडताळणी प्रक्रियेची टक्केवारी केवळ ०.०२ इतकी आहे.
 २१ टक्के प्रक्रिया पूर्ण
राज्यातील जिल्हा परिषदांममध्ये एकूण २,८५,९८० कर्मचारी आहेत. त्यातील १,८४,५३१ कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन सर्व्हिस बुक सुरू झाले आहे. त्यातील ६०,२६१ कर्मचाऱ्यांच्या माहितीची पडताळणी पूर्ण झाली आहे. ४९४३ कर्मचाऱ्यांची पडताळणी प्रक्रिया प्रलंबित आहे. २,२१,००१ कर्मचाऱ्यांची पूर्ण माहितीच भरण्यात आलेली नाही.

Web Title: Nagpur Zilla Parishad first in the state for online service book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.