नागपूर जिल्हा परिषदेचा अधिकारी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 01:20 AM2018-05-12T01:20:37+5:302018-05-12T01:20:54+5:30
महिला ग्रामसेविकेला भ्रष्टाचाराच्या चौकशीत क्लीन चिट देण्याच्या बदल्यात एक लाख रुपयांची लाच मागणारा नागपूर जिल्हा परिषदेचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण सखाराम निंबाळकर (वय ५७) एसीबीच्या सापळ्यात अडकला. शुक्रवारी दुपारी ५० हजारांच्या लाचेचा पहिला हप्ता स्वीकारताना एसीबीच्या पथकाने निंबाळकरला अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिला ग्रामसेविकेला भ्रष्टाचाराच्या चौकशीत क्लीन चिट देण्याच्या बदल्यात एक लाख रुपयांची लाच मागणारा नागपूर जिल्हा परिषदेचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण सखाराम निंबाळकर (वय ५७) एसीबीच्या सापळ्यात अडकला. शुक्रवारी दुपारी ५० हजारांच्या लाचेचा पहिला हप्ता स्वीकारताना एसीबीच्या पथकाने निंबाळकरला अटक केली.
निंबाळकरला एसीबीच्या जाळ्यात अडकवणारी महिला ग्रामसेविका भिवापूर तालुक्यातील चिंचाळा ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक आहे. त्यांच्याकडे आॅगस्ट २०१६ ते जून २०१७ पर्यंत नांद गट ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार होता. चौदाव्या वित्त आयोगांतर्गत साहित्य खरेदी तसेच बांधकामात त्यावेळी नांद गट ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार होती. त्यामुळे सदर महिला ग्रामसेविकेची चौकशी सुरू झाली. भिवापूर पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी तो चौकशी अहवाल उपमुख्य कार्यकारी अधिकारी निंबाळकर यांच्याकडे पाठविला. त्यावर काय निर्णय घ्यायचा, याचे अधिकार निंबाळकरांना होते. त्यामुळे ग्रामसेविकेने त्यांच्याशी संपर्क साधला. तुमच्या विरुद्ध कोणतीही कारवाई न करता. क्लीन चिट देऊन हे प्रकरण बंद करतो, त्यासाठी एक लाख रुपयांची लाच द्यावी लागेल, असे निंबाळकर म्हणाला होता. आधी ५० हजार आणि फाईल बंद केल्यानंतर ५० हजार देण्याची मागणी त्याने केली होती. नोकरी वाचविण्यासाठी महिलेने ती मान्य केली अन् सरळ एसीबीत तक्रार नोंदवली. एसीबीचे अधीक्षक पी. आर. पाटील यांनी या तक्रारीची शहानिशा करून घेतली. त्यात तथ्य असल्याचे पटल्याने त्यांनी कारवाईचे आदेश दिले.
भंडारा चमूने केली कारवाई
निंबाळकर खाबूगिरीसह अन्य काही प्रकरणामुळे जिल्हा परिषद वर्तुळात नेहमी चर्चेत होते. त्यांचे वरिष्ठ पातळीवर प्रभावी हितसंबंध असल्याचे माहीत असल्याने सापळा कारवाईची माहिती लिक होण्याचा धोका होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस अधीक्षक पाटील यांनी निंबाळकरला जेरबंद करण्याची जबाबदारी भंडारा एसीबीचे उपअधीक्षक दिनकर सावरकर यांच्यावर सोपविली. त्यानुसार, एसीबी पथकाने जिल्हा परिषद परिसरात कारवाईची तयारी केली. ठरल्याप्रमाणे तक्रारदार महिला लाचेचे ५० हजार रुपये घेऊन शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास निंबाळकरकडे गेल्या. त्याने बराच वेळ त्यांना तेथे बसवून ठेवले.
.