नागपूर जिल्हा परिषद अध्यक्ष ‘क्वारंटाईन,’ सभा लांबणीवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 08:18 PM2020-07-18T20:18:26+5:302020-07-18T20:20:30+5:30
जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन झाल्यानंतर दर तीन महिन्यात होणारी सर्वसाधारण सभा सहा महिने लोटल्यानंतरही होऊ शकली नाही. सभेवर यापूर्वी कोरोनाच्या ‘लॉकडाऊन’चा परिणाम झाला. लॉकडाऊन संपल्यानंतर अध्यक्षांनी पुढाकार घेऊन सभेची तारीख आणि सभागृहही निश्चित केल्यानंतर अध्यक्षांनाच क्वारंटाईन होण्याची वेळ आली. त्यामुळे २४ जुलैला होणारी सर्वसाधारण सभा पुढे ढकलावी लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन झाल्यानंतर दर तीन महिन्यात होणारी सर्वसाधारण सभा सहा महिने लोटल्यानंतरही होऊ शकली नाही. सभेवर यापूर्वी कोरोनाच्या ‘लॉकडाऊन’चा परिणाम झाला. लॉकडाऊन संपल्यानंतर अध्यक्षांनी पुढाकार घेऊन सभेची तारीख आणि सभागृहही निश्चित केल्यानंतर अध्यक्षांनाच क्वारंटाईन होण्याची वेळ आली. त्यामुळे २४ जुलैला होणारी सर्वसाधारण सभा पुढे ढकलावी लागणार आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षांचे पतीच कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे अध्यक्षांना होम क्वारंटाईन व्हावे लागले आहे. सदस्यांमध्येही कोरोनाच्या भीतीचे सावट आहे. समितीच्या मासिक बैठकीला सदस्य उपस्थित राहत नसल्याने बैठका तहकूब होत आहे. सर्वसाधारण सभेला सर्व सदस्यांची उपस्थिती आवश्यक असते. सर्व अधिकारीसुद्धा उपस्थित असतात. जवळपास १०० ते १२५ लोक एकाच ठिकाणी एकत्र येतात. कोरोनाच्या काळात ही सभा होणे धोक्याचे आहे. सर्वसाधारण सभेअभावी ग्रामीण भागातील विकासकामांच्या अनेक मंजुऱ्या प्रलंबित आहेत. त्यातच अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सर्वसाधारण सभेची परवानगी आवश्यक आहे. विकासकामांना खीळ बसली आहे. हे लक्षात घेता अध्यक्षांनी सभा होण्यासाठी प्रयत्न केले. जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी मिळविली आणि सभागृह सुद्धा निश्चित केले. २४ जुलै तारीखही निश्चित झाली आहे. सभेची नोटीसही निघाली. परंतू आता निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सभा पुढे ढकलावी लागणार आहे. सीईओ योगेश कुंभेजकर यांनी सुद्धा यासाठी दुजोरा दिला आहे.
सध्या मी शासन नियमानुसार गृह विलगीकरणात आहे. सदस्यांमध्ये सुद्धा कोरोनाची भीती आहे. त्यामुळे २४ जुलै रोजी होणारी सभा पुढे ढकलण्यात यावी, यासाठी शासनाकडे विनंती करणार आहे. यासंदर्भात सीईओंशीही चर्चा करण्यात आली आहे.
रश्मी बर्वे, अध्यक्ष, जिल्हा परिषद
सभेवरून मतभेद
२४ जुलै रोजी सभा झालीच पाहिजे, अशी भूमिका शिक्षण व अर्थ सभापती भारती पाटील यांनी व्यक्त केली. अनेक विषय प्रलंबित आहेत. सभेच्या मान्यतेशिवाय काम होणार नाही. कोरोनाची भीती ठेवत ग्रामीण भागातील विकास कामांना खीळ बसता कामा नये. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सभा २४ जुलै रोजी होईल, असे मत कृषी सभापती तापेश्वर वैद्य यांनी व्यक्त केले.
विरोधक म्हणतात सभा झाली पाहिजे
सदस्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते मार्गी लावयचे आहेत. पाच महिन्यापासून सभा झाली नाही. निश्चित तारखेत सभा घेण्यासाठी आमचा आग्रह आहे. अध्यक्ष नसल्यास उपाध्यक्षांकडे जबाबदारी द्यावी.
अनिल निधान, विरोधी पक्षनेते