नागपूर जिल्हा परिषद आरक्षण सोडत : प्रस्थापितांना धक्का ; आरक्षणात बाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 08:54 PM2019-04-30T20:54:17+5:302019-05-01T00:01:03+5:30
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २०१६ आणि २०१८ मध्ये जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत काढण्यात आली होती. आता पुन्हा तिसऱ्यांदा निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मंगळवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. यात अपवाद वगळता प्रस्थापितांचे मतदारसंघ आरक्षणात बाद झाल्याने त्यांना धक्का बसला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २०१६ आणि २०१८ मध्ये जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत काढण्यात आली होती. आता पुन्हा तिसऱ्यांदा निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मंगळवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. यात अपवाद वगळता प्रस्थापितांचे मतदारसंघ आरक्षणात बाद झाल्याने त्यांना धक्का बसला आहे. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे यांच्या उपस्थितीत बचत भवन येथे आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पाडली. शाळकरी मुलाच्या हाताने चिठ्ठ्या काढण्यात आल्या. जिल्हा परिषदेसोबतच पंचायत समित्यांचे आरक्षणही तालुकास्तरावर काढण्यात आले.
तिसऱ्यांदा झालेल्या सोडतीचा फटका वित्त व शिक्षण सभापती उकेश चव्हाण, सभापती दीपक गेडाम, आशा गायकवाड, सत्तापक्षनेते जयकुमार देशमुख, विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे, ज्येष्ठ सदस्य जयकुमार वर्मा, शिवकुमार यादव, रूपराव शिंगणे यांच्यासह जिल्हा परिषदेतील मातब्बरांना बसला आहे. कुठे महिलांसाठी तर कुठे अनुसूचित जाती वा जमातीसाठी सर्कल आरक्षित झाल्याने निवडणुकीतून बाद होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्ष निशा सावरकर व माजी अध्यक्ष संध्या गोतमारे, माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले आदींचे मतदारसंघ पूर्वीप्रमाणेच सेफ राहिले. तर विद्यमान उपाध्यक्ष शरद डोणेकर यांच्या सर्कलमधील कन्हान नगरपरिषद झाली आहे. एक गाव जि.प.मध्ये कायम राहिल्याने त्यांचे सदस्यत्व कायम होते. त्यांना निवडणुकसाठी नवीन सर्कल शोधावे लागणार आहे. प्रस्थापितांचे मागील सोडतीतच सर्कल आरक्षित झाले होते. मात्र तिसºया सोडतीत दिलासा मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. काटोल तालुक्यातील मेटपांजरा मागील सोडतीत सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव झाले होते. यामुळे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले अडचणीत आले होते. मात्र नवीन सोडतीत त्यांचे सर्कलचा सर्वसाधारण गटात समावेश करण्यात आला. मनोहर कुंभारे यांचे तेलकामठी सर्कल अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव झाले आहे.उकेश चव्हाण व शिवकुमार यादव यांचे टेकाडी सर्कल अनुसूचित जाती महिलासाठी राखीव झाल्याने दोघांनाही दुसरे सर्कल शोधावे लागणार आहे. जि.प.अध्यक्ष निशा सावरकर यांचे धानला सर्कल सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाले. तर लगतचे तारसा सर्कल सर्वसाधारण महिलासाठी राखीव निघल्याने सावरकर यांना पुन्हा लढण्याची संधी आहे.
येरखेडा सर्कल सर्वसाधारण गटासाठी खुले झाल्याने जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांना इच्छा असल्यास लढण्याची संधी प्राप्त झाली आहे. हिंगणा तालुक्यातील रायपूर सर्कल सर्वसाधारण गटासाठी असल्याने जि.प.सदस्य उज्ज्वला बोढारे यांना पुन्हा संधी मिळणार आहे. माजी अध्यक्ष संध्या गोतमारे यांना निलडोह व डिगडोह सर्क लमध्ये लढण्याची संधी कायम आहे. गोधनी रेल्वे ओबीसी महिलासाठी राखीव झाल्याने माजी सदस्य कुंदा राऊ त यांना निवडणूक लढण्याची संधी निर्माण झाली आहे. उमरेडमध्ये सिर्सी हे नवीन सर्कल तयार करण्यात आले. सर्कलच्या पुनर्रचनेत बदल झाल्यानंतरही सदस्यांना काही तरी अपेक्षा होती. परंतु आरक्षणाच्या सोडतीत त्यांचा अपेक्षाभंग झाला. मात्र मौदा तालुक्यातील दोन सर्कल सर्वसाधारण तर एक ओबीसीसाठी आरक्षित झाल्याने, माजी सदस्य देवेंद्र गोडबोले यांना लढण्याची संधी मिळणार आहे.
सभापती दीपक गेडाम यांचे सावनेर तालुक्यातील चिचोली सर्कलमध्ये पहिल्या सोडतीत सर्वसाधारण(महिला)साठी राखीव झाले होते. दुसऱ्या सोडतीत आता अनु. जमाती(महिला)साठी राखीव झाले. तिसऱ्या सोडतीत हेच आरक्षण कायम ठेवण्यात आले.
कामठीत फेरबदल, कंभालेंना दिलासा
कामठी तालुक्यात नव्याने झालेल्या कोराडी सर्कलमध्ये निघालेले जुने आरक्षण हे खुल्या गटातील होते. त्यामुळे विद्यमान सदस्य नाना कंभाले यांनी जोर लावला होता. परंतु आरक्षणाच्या दुसऱ्या सोडतीत हे सर्कल सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित झाल्याने त्यांचा अपेक्षाभंग झाला होता. तिसऱ्या सोडतीत सर्वसाधारण गटासाठी आरक्षण निघाल्याने कंभाले यांना दिलासा मिळाला आहे.
नवीन चेहऱ्यांना संधी
सर्कलच्या पुनर्रचनेत आणि जुन्या-नवीन आरक्षणाच्या सोडतीत मोठे फेरबदल झालेले आहेत. प्रस्थापितांना लढण्यासाठी सर्कल नसल्याने त्यांना जिल्हा परिषदेच्या राजकारणातून बाद व्हावे लागणार आहे. मात्र सोडतीमुळे नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. तसेच काही जुन्या सदस्यांनाही संधी मिळणार आहे. मेटपांजरा सर्कल सर्वसाधारण गटासाठी खुले झाल्याने माजी सदस्य दीप्ती काळमेघ यांना निवडणूक लढण्याची संधी प्राप्त झाली आहे.
निवडणुकीबाबत उलटसुलट चर्चा
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच कोराडी व खापरखेडा दोन नगर परिषदांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीला न्यायालयात आव्हान दिले जाईल. निवडणुका पुन्हा लांबणीवर पडतील, अशी जि.प.मध्ये उलटसुलट चर्चा आहे.
जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये जि.प. सर्कलनिहाय आरक्षण
तालुका सर्कल आरक्षण
नरखेड : बेलोना अनुसूचित जाती महिला
सावरगाव ना.मा प्र. महिला
जलालखेडा अनुसूचित जमाती
भिष्णूर ना.मा प्र. महिला
काटोल : येनवा ना.मा.प्र.
पारडसिंगा ना.मा.प्र.
मेटपांजरा सर्वसाधारण
कोंढाळी सर्वसाधारण महिला
कळमेश्वर : तेलकामठी अनुसूचित जमाती महिला
धापेवाडा अनुसूचित जाती
ब्राम्हणी (गोंडखैरी) अनुसूचित जमाती
सावनेर : बडेगाव सर्वसाधारण महिला
वाकोडी ना.मा.प्र.महिला
केळवद ना.मा.प्र.
पाटणसावंगी अनुसूचित जाती महिला
वलनी सर्वसाधारण
चिचोली अनुसूचित जमाती महिला
पारशिवनी : माहुली सर्वसाधारण
करंभाड ना.मा.प्र. महिला
गोंडेगाव सर्वसाधारण
टेकाडी अनुसूचित जाती महिला
रामटेक : पथरई-वडंबा सर्वसाधारण
बोथीयापालोरा ना.मा.प्र.
कांद्री सर्वसाधारण
मनसर अनुसूचित जाती महिला
नगरधन सर्वसाधारण
मौदा : अरोली ना.मा.प्र.
खात सर्वसाधारण महिला
चाचेर सर्वसाधारण
तारसा सर्वसाधारण महिला
धानला सर्वसाधारण
कामठी : कोराडी सर्वसाधारण
येरखेडा सर्वसाधारण
गुमथळा ना.मा.प्र.
वडोदा ना.मा.प्र. महिला
नागपूर : गोधनी रेल्वे ना.मा.प्र. महिला
दवलामेटी सर्वसाधारण
सोनेगाव निपाणी अनु. जाती महिला
खरबी अनु.जाती
बेसा अनु. जाती महिला
बोरखेडी फाटक सर्वसाधारण महिला
हिंगणा : रायपूर सर्वसाधारण
निलडोह ना.मा.प्र.
डिगडोह ना.मा.प्र. महिला
डिगडोह इसासनी ना.मा.प्र. महिला
सातगाव अनु.जमाती महिला
खडकी सर्वसाधारण महिला
टाकळघाट अनु.जाती
उमरेड : मकरधोकडा सर्वसाधारण महिला
वायगाव सर्वसाधारण महिला
बेला सर्वसाधारण महिला
सिर्सी सर्वसाधारण महिला
कुही : राजोला ना.मा.प्र.
वेलतूर सर्वसाधारण महिला
सिल्ली सर्वसाधारण महिला
मांढळ सर्वसाधारण महिला
भिवापूर : कारगाव अनु. जमाती
नांद अनु. जाती महिला
एकूण मतदारसंघ ५८
अनुसूचित जाती ५
अनु. जाती (महिला) ५
अनुसूचित जमाती ३
अनु. जमाती (महिला) ४
ना.मा.प्र. ८
ना.मा.प्र. (महिला) ८
सर्वसाधारण १३
सर्वसाधारण (महिला) १२