नागपूर जिल्हा परिषद : सर्वसाधारण सभेमुळे अडली विकास कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 08:39 PM2020-06-18T20:39:30+5:302020-06-18T20:41:05+5:30
कोरोनामुळे जिल्हा परिषदची मोठी अडचण झाली आहे. अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली. परंतु त्याला सभेची मंजुरी नसल्याने कोट्यवधींची कामे रखडली आहेत. लवकर सभा न झाल्यास बरखास्तीसंदर्भात कायद्याचा पेच निर्माण होणार असल्याचे सांगण्यात येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे जिल्हा परिषदची मोठी अडचण झाली आहे. अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली. परंतु त्याला सभेची मंजुरी नसल्याने कोट्यवधींची कामे रखडली आहेत. लवकर सभा न झाल्यास बरखास्तीसंदर्भात कायद्याचा पेच निर्माण होणार असल्याचे सांगण्यात येते.
जिल्हा परिषद कायद्यानुसार मार्चपूर्वी अर्थसंकल्प मंजूर होणे आवश्यक आहे. कोरोनामुळे अर्थसंकल्पीय सभा जिल्हा परिषदेला घेता आली नाही. शासनाच्या मान्यतेने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीच अर्थसंकल्प मंजूर केला. परंतु अर्थसंकल्पाला सर्वसाधरण सभेची मंजुरी आवश्यक आहे. सभेच्या मंजुरीशिवाय अर्थसंकल्पातील योजनांवर खर्च करता येत नाही. गेल्या तीन महिन्यापासून कोरोनामुळे सभा होऊ शकली नाही. यामुळे अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या कामांना मंजुरी मिळू शकली नाही. त्याचा परिणाम विकास कामांवर झाल्याचे सांगण्यात येते. कोरोनामुळे यंदा निधी कमी मिळणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची आर्थिक कोंडी झाली आहे. नियमानुसार तीन महिन्यातून एकदा सभा घेणे आवश्यक आहे. परंतु गेल्या तीन महिन्यात व त्याआधी दोन महिन्यापासून सभाच झाली नाही. सभा घेण्यासाठी जिल्हा परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे, परंतु त्यावर कोणत्याही प्रकारचे उत्तर आले नाही. आणखी महिनाभर सभा न झाल्यास कायद्याचा पेच निर्माण होऊ शकतो, असे प्रशासनातील जाणकारांचे मत आहे.