नागपूर जिल्हा परिषद :सर्वसाधारण सभेसाठी हवे सुरेश भट अथवा देशपांडे सभागृह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 08:55 PM2020-06-11T20:55:56+5:302020-06-11T20:57:35+5:30
जिल्हा परिषदेने सर्वसाधारण सभेसाठी सुरेश भट सभागृह अथवा देशपांडे सभागृह मिळावे, अशी मागणी जि.प. अध्यक्षांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. तसेच सुरेश भट सभागृहासाठी मनपा आयुक्तांना पत्रही पाठविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेच्या सत्तांतरानंतर अजूनही सर्वसाधारण सभा होऊ शकली नाही. त्यामुळे अनेक विषय सभेच्या मंजुरीविना प्रलंबित पडले आहेत. त्यामुळे जि.प. प्रशासनाने सर्वसाधारण सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण जि.प.च्या आबासाहेब खेडकर सभागृहात कोविड-१९ चे पालन करणे म्हणजेच सामाजिक अंतर ठेवणे शक्य होणार नाही; त्यामुळे जिल्हा परिषदेने सर्वसाधारण सभेसाठी सुरेश भट सभागृह अथवा देशपांडे सभागृह मिळावे, अशी मागणी जि.प. अध्यक्षांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. तसेच सुरेश भट सभागृहासाठी मनपा आयुक्तांना पत्रही पाठविले आहे.
जानेवारी २०२० मध्ये जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. कोविड-१९ मुळे यंदा सत्ताधाऱ्यांना अर्थसंकल्पही सादर करता आला नाही. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीच अर्थसंकल्पाला मंजुरी प्रदान केली. अर्थसंकल्पाला मंजुरी प्रदान झाली असली तरी विविध विकास कामांना सर्वसाधारण सभेतून परवानगी (मंजुरी) प्रदान केल्यानंतरच कामे मार्गी लागतात. तीन महिन्यातून सर्वसाधारण सभा घेण्याचा नियम आहे. परंतु सत्तास्थापनेला पाच महिने लोटूनही सभा होऊ शकली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक महत्त्वाची विकास कामे, महत्त्वाच्या फाईल्स, कामांना मंजुरी मिळणे बाकी आहे. महाराष्ट्र जि.प. व पंचायत समिती अधिनियम १९६१ चे कलम १११ नुसार सर्वसाधारण सभा घेणे आवश्यक आहे. जि.प. प्रशासनाने २४ मार्च रोजी सभा घेण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सभेची परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे आता जूनच्या अखेरपर्यंत सभा घेण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी जि.प.कडून जिल्हाधिकाऱ्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे.
कोविड-१९ च्या नियमांचे पालन होईल
जिल्हा परिषदेच्या सभागृहात कोविड-१९ च्या नियमांचे पालन होऊ शकत नाही. त्यामुळे जि.प.ने दोन सभागृहाचे प्रस्ताव ठेवले आहेत. सभा घेण्यापूर्वी सभागृहाचे पूर्णत: निर्जुंतीकीकरण करण्यात येईल; सोबतच ५८ सदस्य व अधिकाऱ्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचेही पालन करण्यात येईल. याशिवाय प्रत्येक व्यक्तीला मास्क व सॅनिटायझरचेही वाटप करण्याचे जि.प.ने नियोजित केले आहे. जिल्हाधिकाºयांकडून सभेला परवानगीची व मनपा आयुक्तांकडून सभागृह उपलब्ध करून दिल्यास महिन्याच्या अखेरपर्यंत सर्वसाधारण सभा पार पडेल.
रश्मी बर्वे, अध्यक्ष, जि.प. नागपूर