नागपूर जिल्हा परिषदेच्या दहा कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 11:44 PM2018-05-15T23:44:02+5:302018-05-15T23:44:16+5:30

प्रशासनाची दिशाभूल करून विदेशवारीवर गेलेल्या दहा कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी जारी केले आहेत.

Nagpur Zilla Parishad suspended 10 employees | नागपूर जिल्हा परिषदेच्या दहा कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश जारी

नागपूर जिल्हा परिषदेच्या दहा कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश जारी

Next
ठळक मुद्देविदेशवारीचा फटका : बांधकाम विभाग टार्गेट

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रशासनाची दिशाभूल करून विदेशवारीवर गेलेल्या दहा कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी जारी केले आहेत. गेल्या काही वर्षात एकाच वेळी दहा कर्मचाऱ्यांचे निलंबन होणे ही मोठी कारवाई मानल्या जात आहे. या निलंबनात बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
मार्च एन्डिंगची कामे निपटून पर्यटनाच्या उद्देशातून जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे कर्मचारी विदेशवारीवर गेले होते. यात जवळपास २२ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्या काही सेवानिवृत्त कर्मचारीसुद्धा होते. मात्र सर्वाधिक कर्मचारी हे बांधकाम विभागातील असून, बांधकाम विभागातूनच या दौऱ्याचे नियोजन झाले होते. त्यामुळे येथील शिपाईसुद्धा या दौऱ्यात सहभागी झाले होते. ज्या दहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले, त्यांनी विदेशात जाण्यासाठी नियमानुसार परवानगी घेतली नव्हती. त्यांचा हा निष्काळजीपणा चांगलाच भोवला.
विदेशवारीसंदर्भातील वृत्त प्रकाशित झाल्यानंतर सीईओंनी गंभीर दखल घेऊन, याप्रकरणी सुरुवातीला दोन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली. या समितीत बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांचा समावेश असल्याने, चौकशी निष्पक्ष व्हावी म्हणून त्यांना चौकशीतून काढून जिल्हा आरोग्य अधिकारी व लेखा अधिकारी यांची नियुक्ती केली. समितीने संपूर्ण कर्मचाऱ्यांचे लेखी बयान घेतले. या बयानांची उलट तपासणी केली आणि अहवाल सीईओंना सादर केला.
मंगळवारी सकाळी सीईओंनी परवानगी न घेता विदेशवारीवर गेलेल्या १० कर्मचाऱ्यांच्या निलंबनाला मंजुरी देऊन, ती फाईल कारवाईसाठी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता नीता ठाकरे यांच्याकडे पाठविली. यामध्ये जि.प.च्या बांधकाम विभागातील दोन शिपायांसह मुख्य आरेखक, कनिष्ठ प्रशासन अधिकारी (अधीक्षक), कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ अभियंता, आरेखक यांच्यासह रामटेक व मौदा उपविभागाचे दोन शाखा अभियंता तसेच सावनेर पंचायत समितीतील एका शाखा अभियंत्याचा यात समावेश आहे.
कार्यकारी अभियंत्यांची चुप्पी
सीईओंनी निलंबनाची कारवाई मंजूर करून, संबंधित फाईल दुपारी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता नीता ठाकरे कारवाईसाठी पाठविली. ही फाईल कार्यकारी अभियंत्यांना मिळाल्यानंतर, त्यांनी काही कारणास्तव कार्यालय सोडले. सायंकाळपर्यंत निलंबनाचे आदेश कर्मचाऱ्यांना मिळतील, अशी अपेक्षा होती. परंतु कार्यकारी अभियंता न आल्याने आदेश मिळू शकले नाही. कारवाईतील नावे जाणून घेण्यासाठी कार्यकारी अभियंत्यासोबत संपर्क केला असता, प्रतिसाद मिळाला नाही.
 कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा
या विदेशवारीत मोठ्या संख्येने बांधकाम विभागाचे कर्मचारी असल्याने एकाच वेळी सर्वांना सुट्या कशा मंजूर केल्या? यासंदर्भात त्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

Web Title: Nagpur Zilla Parishad suspended 10 employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.