जिल्हा परिषद राबविणार शुन्य कचरा धोरण - सीईओ सौम्या शर्मा
By गणेश हुड | Published: October 2, 2023 04:43 PM2023-10-02T16:43:11+5:302023-10-02T16:43:55+5:30
एक तास स्वच्छतेसाठी महाश्रमदान
नागपूर : शासनाच्या लोककल्याणकारी धोरणांची ग्रामीण भागासोबतच जिल्हा परिषद स्तरावर प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त एक तास स्वच्छतेसाठी हा उपक्रमांतर्गत महाश्रमदान कार्यक्रम राबवून शून्य कचरा धोरण राबण्याचा संकल्प करण्यात आला. ओला व सुका कचरा, कागद, स्टेशनरी साहित्य, प्लास्टिक कचरा, ई-वेस्ट यांचे योग्य व्यवस्थापन करणार असल्याची माहिती जि.प. प्रशासनाने मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी दिली.
स्वच्छता ही सेवा कार्यक्रमांतर्गत रविवारी एक तास स्वच्छतेसाठी हा उपक्रम राबविण्याचे पंतप्रधानांनी देशाला आवाहन केलेले होते. त्यानुसार जि.प.मध्ये महाश्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी शर्मा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
श्रमदानातून जि.प. कार्यालय,परिसर स्वच्छ - सुंदर ठेवा, प्रत्येक विभागातील कर्मचा-यांनी श्रमदान करतांना कार्यालयीन व्यवस्थापनांमध्ये विविध ठिकाणांवर आवश्यक असलेल्या सुधारणांसाठीचे वैयक्तिक अभिप्राय लिखीत स्वरुपात देण्याच्या सूचना सौम्या शर्मा यांनी केल्या. महाश्रमदानात जि.प.च्या विभागांचे विभाग प्रमुख, अधिकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. अधिकारी व कर्मचा-यांनी आपल्या कार्यालयातील अंतर्गत स्वच्छता केली.
जिल्हा परिषदेत शून्य कचरा धोरण राबविण्याच्या अनुषंगाने शर्मा यांनी जि.प.च्या नविन व जून्या इमारतींमधील सर्व विभागांना प्रत्यक्ष भेटी देवून कार्यालयीन स्वच्छतेबाबत पाहणी केली. आसन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृहे, कचरा संकलन केंद्र, विभागनिहाय कचरा संकलन व्यवस्था ईत्यांदींची पाहणी करुन आवश्यक सूचना विभाग प्रमुखांना केल्या. जि.प.सोबतच पंचायत समित्या, ग्रामपंचायतीत एकाच दिवशी महाश्रमदान उपक्रम राबविण्यात आला.