नागपूर जिल्हा परिषद साई मंदिराजवळ उभारणार शेतकरी बचत गटांसाठी मॉल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 12:02 AM2021-01-07T00:02:01+5:302021-01-07T00:03:47+5:30
Mall for farmers' self help groups , nagpur news बडकस चौकातील मॉल बनता बनता भाजपाची सत्ता जि.प.तून गेली. आता नव्या सत्ताधाऱ्यांनी साई मंदिराजवळील जिल्हा परिषदेच्या जागेवर शेतकरी बचत गटासाठी मॉल उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बडकस चौकातील मॉल बनता बनता भाजपाची सत्ता जि.प.तून गेली. आता नव्या सत्ताधाऱ्यांनी साई मंदिराजवळील जिल्हा परिषदेच्या जागेवर शेतकरी बचत गटासाठी मॉल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. बांधकाम समितीच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
बुधवारला उपाध्यक्ष व बांधकाम समिती सभापती मनोहर कुंभारे यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम समितीची बैठक पार पडली. यात या विषयावर चर्चा झाली. त्याचसोबत बडकस चौकातील जागेवर महिला बचत गटाकरिता मॉल उभारण्याचे नियोजित आहे. २०१६ मध्ये सदर मॉलकरिता २५ कोटी खर्च अपेक्षित होता. तसा प्रस्तावही शासनाला पाठविण्यात आला होता. तो निधीही मंजूर आहे. परंतु आता दरवाढीमुळे याचा खर्चही वाढणार आहे. त्यामुळे हा वाढीव खर्च डीपीसीच्या माध्यमातून मागणार असून, तसा प्रस्तावही सादर करण्यात येणार असल्याचे कुंभारेंनी सांगितले. याशिवाय वर्धा रोडवरील साई मंदिर मागील जि.प.च्या जागेवर शेतकरी बचत गटांकरिता मॉल बांधण्यात येणार आहे. तेथे फळे, भाजीपाला आदी साहित्य शेतकरी बचत गटांच्या माध्यमातून विक्री होतील, यासाठी कार्यकारी अभियंतांना जागेचे अवलोकन करुन तेथे मॉल उभारण्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे, याबाबतची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहे, त्यानंतर यासाठी शासनाकडे निधीची मागणी करण्यात येणार आहे.