नागपूर जिल्हा परिषदेच्या सर्कलची तिसऱ्यांदा होणार पुनर्रचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:00 AM2019-03-28T00:00:46+5:302019-03-28T00:06:38+5:30
जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपून दोन वर्षे लोटली. यादरम्यान दोनवेळा सर्कलची पुनर्रचना व आरक्षण सोडत काढण्यात आली. मात्र आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे दोन्हीवेळा आयोगाने कार्यक्रम रद्द केला. अखेर निवडणूक आयोगाने बुधवारी नागपूरसह वाशिम, अकोला, नंदूरबार व धुळे जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद निवडणुकीची सर्कल रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार नागपूर जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची सोडत ३० मे रोजी होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपून दोन वर्षे लोटली. यादरम्यान दोनवेळा सर्कलची पुनर्रचना व आरक्षण सोडत काढण्यात आली. मात्र आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे दोन्हीवेळा आयोगाने कार्यक्रम रद्द केला. अखेर निवडणूक आयोगाने बुधवारी नागपूरसह वाशिम, अकोला, नंदूरबार व धुळे जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद निवडणुकीची सर्कल रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार नागपूर जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची सोडत ३० मे रोजी होणार आहे.
या कारणास्तव रखडल्या निवडणुका
राज्य शासनाने नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी, वानाडोंगरी व बुटीबोरी या नगर परिषद व नगर पंचायती नव्याने गठित केल्या होत्या. त्यावर उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. तसेच जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीत राखीव जागाचे आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त होत असल्याने जि.प.च्या माजी सदस्यांनी याचिका दाखल केली होती.
निवडणूक आयोगाने का घेतला निर्णय
न्यायालयाने राज्य शासनास ५० टक्के आरक्षणासंदर्भात तीन महिन्याच्या आत निर्णय घ्यावा, तोपर्र्यंत निवडणुका घेण्यात येऊ नयेत, असे निर्देश दिले होते. परंतु तीन महिन्याची मुदत संपल्यानंतरही शासनाने त्यासंदर्भात कसलाही निर्णय घेतला नाही. यासंदर्भात निवडणूक आयोगानेसुद्धा शासनाला वारंवार पत्र, सूचना व बैठका घेऊन सूचित केले, परंतु शासनाने त्याचीही दखल घेतली नाही. न्यायालयाने दिलेल्या कालावधीची मुदत संपल्यामुळे निवडणूक आयोगाने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ (ई)नुसार निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नागपूर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या १३ पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेसाठी आयोगाने आदेश दिले आहे. नवीन प्रभाग रचनेत बुटीबोरी नगर परिषद क्षेत्र वगळून जिल्ह्याच्या उर्वरित ग्रामीण क्षेत्रासाठी २०११ च्या जनगणनेच्या आधारे ५८ सदस्यसंख्येची पंचायत समिती क्षेत्रनिहाय सर्कलची विभागणी करायची आहे.
असा आहे प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम
- प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे १८ एप्रिल रोजी सादर करायचा आहे.
- २५ मार्चपर्यंत विभागीय आयुक्तांनी प्रभाग रचनेस मान्यता द्यायची आहे.
- आरक्षण सोडतीची सूचना २७ एप्रिलला प्रसिद्ध करायची आहे.
- जिल्हा परिषद निवडणुकीची सोडत ३० एप्रिलला करायची आहे.
- पंचायत समितीची सोडत २ मे रोजी करायची आहे.
- हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी २ ते ६ मे आहे.
- हरकती व सूचनांवर सुनावणी १० मे रोजी घ्यायची आहे.
- अंतिम प्रभाग रचना व आरक्षण १३ मे रोजी प्रसिद्ध करायचे आहे.
सदस्य संख्या जैसे थे
जिल्हा परिषदेतील पारशिवनी ही नगर पंचायत तर वानाडोंगरी व बुटीबोरी नगर परिषद गठित करण्यात आली आहे. त्यामुळे जि.प.चे ५८ पैकी किमान ३ सदस्य कमी होतील, अशी अपेक्षा होती. पण आयोगाने सर्कलची पुनर्रचना करताना ५८ सदस्य गृहित धरून सर्कल रचना करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची सदस्य संख्या जैसे थेच राहणार आहे.