नागपूर जि.प. व पं.स. ला ६४.१३ टक्के मतदान : आज फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 11:43 PM2020-01-07T23:43:00+5:302020-01-07T23:47:47+5:30
जिल्हा परिषदेचे ५८ गट व पंचायत समितीच्या ११६ गणासाठी मंगळवारी शांततेत मतदान पार पडले. मतदार यादीतील त्रुटींमुळे जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मतदारांची धावपळ दिसून आली. जिल्ह्यात सरासरी ६४.१३ टक्के मतदान झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेचे ५८ गट व पंचायत समितीच्या ११६ गणासाठी मंगळवारी शांततेत मतदान पार पडले. मतदार यादीतील त्रुटींमुळे जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मतदारांची धावपळ दिसून आली. जिल्ह्यात सरासरी ६४.१३ टक्के मतदान झाले. यात ९,१०,७३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ४,८२,७७९ पुरुष तर ४,२७,९४४ महिलांचा समावेश आहे. बुधवारी जिल्ह्यातील १३ ही तालुक्यात सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होईल. साधारणत: दुपारी १२ वाजतानंतर कौल येण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात नरखेड, सावनेर, काटोल येथील काही मतदान केंद्रावर रात्री ७.३० पर्यंत मतदानाची प्रक्रिया चालली. जिल्ह्यात एकुण झालेल्या मतदानापैकी सर्वाधिक ७४.२१ टक्के मतदान उमरेड तालुक्यात तर सर्वात कमी ५१.४५ टक्के मतदान नागपूर ग्रामीण तालुक्यात झाले.
जिल्ह्यात सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी मतदान केंद्रावर राज्याचे पशु व दुग्ध संवर्धन विकास मंत्री सुनील केदार यांनी मतदानाचा हक्क बजावला.
काही केंद्रांवर बीयू व सीयूमध्ये बिघाड
मतदानावेळी जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील एका मतदान केंद्रावर सीयू (कंट्रोल युनिट), सावनेर तालुक्यातील तीन मतदान केंद्रावर बॅलेट युनिट व एक कंट्रोल युनिट, कळमेश्वरमधील एका मतदान केंद्रावर बॅलेट युनिट, रामटेकमधील प्रत्येकी दोन मतदान केंद्रावर बॅलेट व कंट्रोल युनिटमध्ये बिघाड झाल्याने, ते बदलविण्यात आले. तर कामठी व भिवापूर तालुक्यातील प्रत्येकी एका मतदान केंद्रावर अनुक्रमे एक बॅलेट युनिट व कंट्रोल युनिटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदानावेळी ते बदलविण्यात आले.
प्रशासन तत्पर
जिल्ह्यात निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरावरील प्रशासन आज तत्पर दिसून आले. तालुक्यात कुठूनही तक्रार आल्यास त्याचे तहसीलदारांकडून तत्काळ निराकरण करण्यात येत होते. पोलीस प्रशासनानेही जिल्ह्यात शांततेत मतदान पार पाडण्यासाठी महत्त्वाची भूमिका वठविली.
तालुकानिहाय मतदान
नरखेड - ६६.२१
काटोल - ६९.२६
कळमेश्वर - ६६.६७
सावनेर - ६०.४४
पारशिवनी - ६२.८५
रामटेक - ६६.१८
मौदा - ७५.२१
कामठी - ६५.६९
नागपूर ग्रामीण - ५१.४५
हिंगणा - ५९.४२
उमरेड - ७४.०१
कुही - ७१.७६
भिवापूर - ६६.६०
नगरधनमध्ये एकाच बुथवर मतदानाचा फ्लो
नगरधनमध्ये स्व. इंदिरा गांधी विद्यालय येथे ४ बुथ होते. पण २१२ क्रमांकाच्या बुथवर सकाळपासूनच गर्दी काही ओसरत नव्हती. दुपारी ३ वाजताच्या सुमारास शेकडोच्या संख्येने मतदार लाईन लावून उभे होते. या शाळेत इतर तीन बुथवर निवांत मतदान सुरू होते. बुथ क्रमांक २१२ मध्ये मतदार यादीमध्ये काही चुका झाल्यामुळे मतदारांची गर्दी वाढल्याचे उमेदवाराच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले. तसेच या बुथवरची मशीन स्लो ऑपरेट होत असल्याचीही तक्रार प्रतिनिधींनी केली.