जिप सभापतीपदाची निवड; लेकुरवाळे, सुटे, कुसुंबे, जोध यांचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2022 11:06 AM2022-11-02T11:06:59+5:302022-11-02T11:08:34+5:30

सभापतींच्या निवडणुकीत बंडखोरी कायम : राष्ट्रवादीत देशमुख गटाला झुकते माप

Nagpur | ZP speaker Election of Chairman; Victory of Lekurwale, Sutte, Kusumbe, Jodh | जिप सभापतीपदाची निवड; लेकुरवाळे, सुटे, कुसुंबे, जोध यांचा विजय

जिप सभापतीपदाची निवड; लेकुरवाळे, सुटे, कुसुंबे, जोध यांचा विजय

googlenewsNext

नागपूर :जिल्हा परिषदेच्या सभापतिपदांसाठी झालेल्या निवडणुकीत कामठी विधानसभेतील अवंतिका लेकुरवाळे, उमरेड विधानसभा मतदारसंघातील मिलिंद सुटे, रामटेक मतदारसंघातील राजकुमार कुसुंबे व काटोल मतदारसंघातील प्रवीण उर्फ बाळू जोध हे निवडून आले आहेत. तर काँग्रेसमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी झालेली बंडखोरी सभापतींच्या निवडणुकीत कायम दिसून आली. तिकडे राष्ट्रवादीला सभापतिपद देताना देशमुख गटाला झुकते माप देण्यात आले. सभापतिपदाची उमेदवारी देताना ज्येष्ठ सदस्यांना डावलण्यात आल्याची नाराजी पुन्हा एकदा दिसून आली.

मंगळवारी सभापतिपदासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात मतदानप्रक्रिया घेण्यात आली. निवडणुकीत भाजपने पुष्पा चाफले, सुभाष गुजरकर, सतीश डोंगरे, राधा अग्रवाल व प्रणिता दंडारे यांचे अर्ज दाखल केले होते; परंतु राधा अग्रवाल यांनी अर्ज मागे घेतला. ५२ सदस्यांनी मतदानाच्या प्रक्रियेत भाग घेतला. तर ६ सदस्य अनुपस्थित होते. विशेष म्हणजे सभापतिपदाचे उमेदवार देताना काँग्रेसने सर्व सदस्यांना जंगल सफारी घडवत, फार्महाऊसवर एकत्र ठेवले. शेवटपर्यंत उमेदवारांची नावे जाहीर केली नाही.

सभापतिपदासाठी अनेकजण इच्छुक होते. काँग्रेसने नावे जाहीर करताच काहींना धक्का लागला. यावर काहींनी नाराजीही व्यक्त केली. रामटेक विधानसभा मतदारसंघातून दुधाराम सव्वालाखे व शांता कुमरे यांच्या नावाची चर्चा होती; परंतु राजकुमार कुसुंबे यांना लॉटरी लागली. कुसुंबे हे सुनील केदार यांचे विश्वासू असल्याचे सांगण्यात येते.

मिलिंद सुटे यांच्या नावाला उमरेडमधील काही नेत्यांनी विरोध केल्याची माहिती आहे. परंतु, केदार व माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्या बाजू घेतल्याने त्यांचे नाव अंतिम झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. या निवडणुकीत सर्व विजयी उमेदवारांना ३८ मते मिळाली, तर पराभूत उमेदवारांच्या पारड्यात १३ मते पडली. विजयानंतर माजी मंत्री सुनील केदार, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, जि.प. चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, चंद्रपाल चौकसे, हुकुमचंद आमधरे, प्रकाश वसु, सलिल देशमुख आदींनी नवनियुक्त सभापतींचे स्वागत केले.

- कंभाले, कवरे यांचा बहिष्कार, मानकर तटस्थ

अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत बंडखोरी करणारे नाना कंभाले व प्रीतम कवरे यांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला. तर काँग्रेसच्या मेघा मानकर या सभागृहात उपस्थित होत्या. भाजपकडून त्यांचा अर्जही भरण्यात येणार होता; पण त्यांनी सभागृहात तटस्थ भूमिका घेतली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना त्यांनी मी तटस्थ असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे शिवसेना (शिंदे समर्थक) सदस्य संजय झाडे हे जिल्हा परिषदेत येऊनही सभागृहात अनुपस्थित होते.

- ६ उमेदवार अनुपस्थित

  • नाना कंभाले, सदस्य, काँग्रेस (बहिष्कार)
  • प्रीतम कवरे, सदस्य, काँग्रेस (बहिष्कार)
  • आतिष उमरे, विरोधी पक्षनेते भाजप (अनुपस्थित)
  • सलिल देशमुख, सदस्य राष्ट्रवादी (मुंबई येथे विशेष कोर्टात सुनावणीसाठी गेले.)
  • शंकर डडमल, सदस्य, काँग्रेस (फरार)
  • संजय झाडे, सदस्य, बाळासाहेबांची शिवसेना (अनुपस्थित)

- उमेदवार व मिळालेली मते

*समाज कल्याण समिती*

मिलिंद सुटे (काँग्रेस) - ३८

सुभाष गुजरकर (भाजप) - १३

*महिला व बाल कल्याण समिती*

अवंतिका लेकुरवाळे (काँग्रेस) - ३८

पुष्पा चाफले (भाजप) - १३

*विषय समिती सभापती*

राजकुमार कुसुंबे (काँग्रेस) - ३८

प्रमिला दंडारे (भाजप) - १३

*विषय समिती सभापती*

प्रवीण जोध (राष्ट्रवादी) - ३८

सतीश दंडारे (भाजप) - १३

Web Title: Nagpur | ZP speaker Election of Chairman; Victory of Lekurwale, Sutte, Kusumbe, Jodh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.