नागपूर जि.प.त २७६ तर पंचायत समितीत ४९७ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 10:12 PM2019-12-30T22:12:18+5:302019-12-30T22:14:02+5:30
र्ज मागे घेण्याच्या दिवशी जि.प.मध्ये १४९ व पंचायत समितीमध्ये १६९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या रिंगणात आता २७६ व पंचायत समितीच्या रिंगणात ४९७ उमेदवार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली होती. त्यामुळे अधिकृत उमेदवाराबरोबरच राजकीय पक्षांचीही चांगलीच डोकेदुखी वाढली होती. जास्तीत जास्त बंडखोरी टाळण्यासाठी स्थानिक नेतेमंडळीनी जोरकस प्रयत्न केले. अनेक बंडखोर उमेदवारांपुढे आश्वासनांचे इमले बांधले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बंडखोरी शमली आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी जि.प.मध्ये १४९ व पंचायत समितीमध्ये १६९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या रिंगणात आता २७६ व पंचायत समितीच्या रिंगणात ४९७ उमेदवार आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जिल्हा परिषदेसाठी ५०० व पंचायत समितीसाठी ७३७ अर्ज दाखल झाले होते. २४ डिसेंबर रोजी या अर्जाची छाननी झाली असता, जि.प. मध्ये १६ व पं.स. मध्ये २६ अर्ज अवैध ठरले. त्यामुळे वैध उमेदवारांची संख्या जि.प.मध्ये ४२५ व पं.स. मध्ये ६६६ एवढी होती. जिल्हा परिषदेचे ५८ तर पंचायत समितीचे ११६ सर्कल आहेत. सात वर्षानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक होत असल्याने, राजकीय पक्षाकडे मोठ्या संख्येने अर्ज आले होते. भाजपाकडे तर जिल्हा परिषदेसाठी ७५० अर्ज आले होते. एकेका सर्कलमधून १०-१० उमेदवार इच्छुक होते. पण यातून ५८ उमेदवारांची निवड करायची होती. त्यामुळे भाजपा असो की काँग्रेस दोन्ही मुख्य राजकीय पक्षाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली. प्रत्येक सर्कलमध्ये अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध किमान दोन बंडखोर उभेच ठाकले होते. त्यामुळे अधिकृत उमेदवाराबरोबरच राजकीय पक्षांचीही चिंता वाढली होती. बंडखोरीमुळे अधिकृत उमेदवारांना मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता होती. मात्र राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींनी मोठ्या प्रमाणात बंडखोरी टाळली. जिल्हा परिषदेत १४९ उमेदवारांनी अर्ज मागे घेणे, हे राजकीय नेत्यांना आलेले यशच मानावे लागेल.
तालुकानिहाय अधिकृत उमेदवार
तालुका जि.प. पंचायत समिती
नरखेड १६ ३५
काटोल १५ ३०
कळमेश्वर १२ २२
सावनेर २५ ४२
पारशिवनी २४ ३५
रामटेक ३५ ५४
मौदा १९ ४४
कामठी २० ३५
नागपूर ग्रामीण २८ ४६
हिंगणा २५ ४८
उमरेड २३ ३८
कुही २४ ४९
भिवापूर १० १९