नागपूर जि.प. च्या ७३२ विद्यार्थ्यांना मिळणार प्रवास भत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 11:30 PM2019-08-02T23:30:25+5:302019-08-02T23:31:54+5:30
गावात शाळा नाही म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडू नये, गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे, म्हणून शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता देण्याचा निर्णय घेतला. यावर्षी प्रवास भत्ता सहा हजार रुपये करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील ७३२ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गावात शाळा नाही म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडू नये, गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे, म्हणून शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता देण्याचा निर्णय घेतला. यावर्षी प्रवास भत्ता सहा हजार रुपये करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील ७३२ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
विद्यार्थ्याच्या गावातून शाळा १ किलोमीटरच्या वर असेल अशा विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता देण्यात येतो. गेल्या वर्षी ग्रामीण भागातील ५५ विद्यार्थ्यांना प्रती विद्यार्थी वार्षिक तीन हजार रुपयेप्रमाणे प्रवास भत्ता दिला होता. मुळात भत्ता देण्याचे दुसरेही एक कारण म्हणजे जि.प.च्या शाळांची पटसंख्या कमी होत आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १५३१ शाळा आहे. या शाळांची पटसंख्या ही दरवर्षी घसरतच चालली आहे. चार वर्षांत पटसंख्या १६ हजाराने घटली आहे. यंदा जि.प.शाळांतील विद्यार्थी पटसंख्या ही ७१ हजार ४४८ इतकी आहे. गतवर्षी शिक्षण विभागाकडून सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्याच्या १३ तालुक्यातील १ कि.मी. पेक्षा जास्त अंतरावर शाळेत जाणाऱ्या ५५ विद्यार्थ्यांना प्रवासभत्त्यापोटी ३०० रुपये महिन्याप्रमाणे दहा महिन्याकरिता ३ हजार रुपये देण्यात आले होते. यंदा शासनाने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांचे समायोजन करून त्या बंद करण्याचा मानस बाळगला आहे. गेल्या वर्षी राज्यात १३०० शाळा बंद करण्यात आल्या होत्या. कमी पटसंख्येच्या शाळांचे नजीकच्या शाळेमध्ये समायोजन करुन विद्यार्थ्यांसह शिक्षकांचेही समायोजन करण्याचा शासनाचा मानस आहे. यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढेल असा विश्वास शासनाला आहे. सोबतच शिक्षकाच्या वेतनावर होणारा खर्च, पूर्वी सर्व शिक्षा अभियाना आता 'समग्र'अंतर्गत शाळेवर होणार खर्च लक्षात घेता, शासनावर कोट्यवधीचा बोझा पडतो आहे. तो कमी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.