नागपूरकर सलाईनवर
By admin | Published: March 24, 2017 02:32 AM2017-03-24T02:32:49+5:302017-03-24T02:32:49+5:30
सुरक्षेच्या मागणीला घेऊन चौथ्या दिवशी, गुरुवारी मेयो, मेडिकलचे निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर होते. यातच इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) ....
खासगी डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांची धावाधाव : मेयो, मेडिकलमध्ये केवळ अत्यावश्यक सेवा, उपचारासाठी रुग्णांची तासन्तास प्रतीक्षा
नागपूर : सुरक्षेच्या मागणीला घेऊन चौथ्या दिवशी, गुरुवारी मेयो, मेडिकलचे निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर होते. यातच इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) ३५०० डॉक्टरांसह विविध वैद्यकीय असोसिएशनचे डॉक्टरही या संपात सहभागी झाल्याने उपराजधानीची रुग्णसेवाच कोलमडली. साधा ताप, सर्दी, खोकला, पोटदुखी व किरकोळ जखमी रुग्णांना उपचारासाठी वेळेवर धावाधाव करण्याची वेळ आली. खासगी रुग्णालयाने बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) बंद असल्याचे फलक लावल्याने व मेयो, मेडिकलमध्ये अपुरे डॉक्टर असल्याने अख्खे नागपूरकर सलाईनवर आले. संप वाढल्यास परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे.
खासगी इस्पितळांमध्ये ‘ओपीडी’ बंदचे बॅनर
शहरात सुमारे ६५० खासगी रुग्णालयांमध्ये ‘ओपीडी’बंदचे बॅनर लागले होते. काही ‘क्लिनीक’ उघडे असलेतरी डॉक्टर उपस्थित नसल्याची माहिती तेथील कर्मचारी देत होते. मोठ्या रुग्णालयांमध्ये सामान्य रुग्णांना ‘ओपीडी’ बंद असल्याचे कारण सांगून परत पाठविले जात होते. तसे पत्र सूचना फलकांवर लावण्यात आले होते. केवळ अतिगंभीर रुग्णांवर उपचार केले जात होते. सामान्य रुग्ण उपचारासाठी मेयो, मेडिकलमध्ये धाव घेत होते, परंतु येथे आधीच रुग्णांची गर्दी त्यातही मोजकेच डॉक्टर असल्याने अनेकांवर तासन्तास ताटकळत बसण्याची वेळ आली.
सामूहिक रजेवर गेलेल्या मेयो, मेडिकलच्या ४४० निवासी डॉक्टरांवर बुधवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. ही कारवाई मागे घेण्यात यावी, डॉक्टरांना योग्य सुरक्षा उपलब्ध करून देण्यात यावी व डॉक्टर संरक्षण कायद्याचे कठोरतेने पालन करण्याच्या मागणीला घेऊन बुधवार दुपारपासून ‘आयएमए’ने संपावर जाण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी या संपात रेडिओलॉजी, पॅथालॉजी, इंडियन डेंटल असोसिएशनही सहभागी झाल्याने परिस्थिती चिघळली.
सोमवारपासून निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर गेल्याने मोठी जबाबदारी वरिष्ठ निवासी डॉक्टरांवर आली. परंतु गुरुवारपासून त्यांनीही असहकार आंदोलन सुरू केल्याने मेयोमध्ये दोन गंभीर व एक किरकोळ तर मेडिकलमध्ये नऊ गंभीर शस्त्रक्रिया होऊन एकही किरकोळ शस्त्रक्रिया झाली नाही. यामुळे अनेक शस्त्रक्रिया रद्द तर काही पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. तातडीची शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असलेल्या रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.
अकुशल डॉक्टरकडून रुग्णांवर उपचार
मेडिकलमध्ये आरोग्य विभागाचे ३५ डॉक्टर आहेत. यातील अनेक डॉक्टरांना साधी सलाईनही लावता येत नाही. गुरुवारी दुपारी एका सात-आठ महिन्यांच्या मुलाला गेल्या पाच-सहा दिवसांपासून शौचास झाली नाही. त्याच्या आई वडिलांनी मोठ्या अपेक्षेने उपचारासाठी मेडिकलमध्ये आणले. वॉर्ड क्र. सहा मध्ये भरती केले. परंतु तेथील आरोग्य विभागाच्या कनिष्ठ निवासी डॉक्टराने सलाईन लावण्यासाठी त्या चिमुकल्याला तब्बल चार-पाच वेळा सुई टोचली, परंतु नस सापडली नाही. अखेर नातेवाईकांच्या आरडा-ओरडीनंतर वरिष्ठ डॉक्टरांनी सलाईन लावून दिली. अशीच स्थिती इतरही वॉर्डात होती. विशेष म्हणजे, दुपारी २ वाजेनंतर अनेक वॉर्डात वरिष्ठ डॉक्टर हजर नसल्याचे दिसून आले. केवळ परिचारिका आणि त्यांच्या मदतीला शिकाऊ डॉक्टर होते.
ओपीडीत गर्दी, वॉर्ड मात्र अर्धे रिकामे
मेडिकलमध्ये गुरुवारी सकाळी ओपीडीमध्ये २२६८ रुग्णांनी उपचार घेतला. मात्र दिवसभरात केवळ १६४ रुग्णांना दाखल करून घेण्यात आले. इतर दिवसांच्या तुलनेत ही ५० टक्केही संख्या नसल्याचे खुद्द डॉक्टरांचे म्हणणे आहे. नेहमीच फुल्ल असणाऱ्या १४०० खाटा सध्याच्या स्थितीत अर्ध्यापेक्षा जास्त रिकाम्या होत्या. केवळ अत्यावश्यक रुग्णांना वॉर्डात थांबविले जात होते तर इतरांना घरी पाठविले जात होते. विशेष म्हणजे, औषधवैद्यकशास्त्र विभागाचा वॉर्ड क्र. २६ मधून आज तब्बल नऊ रुग्णांना सुटी देण्यात आली. सध्याच्या स्थितीत ३० खाटांच्या या वॉर्डात केवळ १५ रुग्ण भरती आहेत. मेयोच्या ओपीडीमध्ये आज १७७८ रुग्णांनी उपचार घेतले. मात्र केवळ ३१ रुग्णांना दाखल करण्यात आले होते.
वरिष्ठ निवासी डॉक्टरांचीही पाठ
मेयो, मेडिकलचे निवासी डॉक्टर रजेवर गेल्याने सर्वाधिक जबाबदारी येथील वरिष्ठ निवासी डॉक्टरांवर आली होती. गेल्या तीन दिवसांपासून ते दिवस-रात्र सेवाही देत होते, परंतु बुधवारी निवासी डॉक्टरांच्या निलंबनाचे आदेश येताच त्यांनीही हात वर केले आहे. केवळ आकस्मिक सेवा देण्याचे स्पष्ट धोरण स्वीकारले आहे. यामुळे अनेक शस्त्रक्रिया रद्द तर काही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याचा गरीब रुग्णांना मोठा फटका बसत आहे.
मेयोच्या अधिष्ठाता सुट्यांवर
निवासी डॉक्टरांच्या कामबंद आंदोलनामुळे मेयोतील शस्त्रक्रियेपासून ते बाह्यरुग्ण विभाग प्रभावित झाले आहे. असे असताना, अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे शुक्रवारपसून सुट्यांवर जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.